राजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत नसल्याने ते रखडले आहे. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार प्रकल्पाचा अंतिम आराखडा ठरवण्यात येणार आहे.

एमएमआरडीए मुंबईत मेट्रोचे जाळे उभारणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष घालत आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी मेट्रो भाजपसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. दुसरीकडे या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड शिवसेनेसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे श्रेय कोण घेणार, यावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

कोस्टल रोडला केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांचे मोठे योगदान आहे, असा भाजपचा दावा आहे, तर हा प्रकल्प शिवसेनेचा असल्याने उद्धव ठाकरेंच्या हस्तेच भूमिपूजन व्हायला हवे, असा आग्रह शिवसेनेचा आहे.

हे भूमिपूजन राजकीय वादात अडकले असले तरी महानगरपालिकेने प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. कार्यादेश मिळाल्यानंतर पालिकेने काम सुरू केले नसते तर प्रकल्पाला विलंब झाला असता, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भूमिपूजन
लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जानेवारी किंवा फेब्रुवारीत या प्रकल्पाचे  भूमिपूजन होण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेची गोची का?
उद्धव ठाकरे हे वैधानिक पदावर नाहीत. पालिकेच्या कोणत्याही सोहळ्यात ते सर्वांत शेवटी भाषण करतात; मात्र पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री कार्यक्रमाला असल्यास राजकीय शिष्टाचारामुळे ठाकरे यांना मानाची जागा मिळण्यास अडचण होते.

Web Title: Bhumi pujan of the Coastal Road stalled in the political debate