पोलादपूरमधील भुतकर भगिनींची उत्तुंग भरारी...

स्‍कुबा डायविंग करताना  प्रचिती भुतकर. शिवशाहीर पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना समृद्धी भुतकर.
स्‍कुबा डायविंग करताना प्रचिती भुतकर. शिवशाहीर पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना समृद्धी भुतकर.

पोलादपूर (बातमीदार) : गिर्यारोहण क्षेत्रात पोलादपूरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर मातब्बर असे नाव म्हणजे कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष व ॲक्‍टिव्हिटीप्रमुख प्रशांत भुतकर हे ठरले. भुतकर यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या दोन्ही कन्या समृद्धी व प्रचिती या आई मोनिका भुतकर हिच्या व परिवाराच्या पाठबळाने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयाकडे मार्गक्रमण करत आहेत.

काही दिवसांपूर्वी गोवा येथे जाऊन प्रचिती हिने स्कुबा डायविंगमधील ॲडव्हान्स कोर्स यशस्वी पूर्ण केला. कोकणपट्टीतील अंडरवॉटर ॲक्‍टिव्हिटीचा हा कोर्स पूर्ण करणारी ती सर्वांत लहान व पहिली मुलगी ठरली आहे. या कोर्सच्या वेळी तिला पाठबळ देण्यासाठी तिच्या आईसह मामा ॲड. विश्वनाथ टाळकुटे आणि बंधू आकाश भुतकर यांनी अथक परिश्रम घेतले. हिमहिरकणी म्हणून गिर्यारोहण क्षेत्रात वयाच्या अकराव्या वर्षी १७ हजार ५०० फूट उंचीचे हिमालय फ्रेंडशिप शिखर २०१२ मध्ये सर करणारी सर्वांत लहान पहिली गिर्यारोहक मुलगी म्हणून समृद्धीच्या नावाची विश्वविक्रमात नोंद करण्यात आली.

त्यानंतर एका वेळी दोन्ही हिमालयीन शिखर सर करण्याचा विक्रम, नवीन हिमशिखर पहिली चढून जाणारी गिर्यारोहक, तर सलग पाच वर्षे हिमालयातील १७००० फुटांपेक्षा जास्त उंचीची वेगवेगळी हिमशिखरे सर करण्याचा विक्रम असे चार विश्वविक्रम समृद्धीच्या नावे यापूर्वीच नोंदवले गेले. या सर्व हिमालय मोहिमा समृद्धी व तिच्या वडिलांनी गिरिप्रेमी संस्था पुणे यांच्या माध्यमातून सहभाग घेऊन यशस्वी केल्या.

समृद्धी व तिचे वडील प्रशांत यांनी संयुक्तरित्या हिमालयातील पटलासु शिखर यशस्वी सर केले. जगातील पहिले पिता व कन्या अशा विश्वविक्रमाची त्‍यांनी नोंद केली आहे. हे विश्वविक्रम सन्मानपत्र समृद्धीने वडिलांचे आदर्श स्थान आणि शिवशाहीर प्रख्यात ऐतिहासिक विश्‍लेषक बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्राप्त केले. हे सन्मानपत्र म्हणजे समृद्धी हिचा पाचवा विश्वविक्रम, तर प्रशांत भुतकर यांना यांच्या नावे मरणोत्तर नोंद झालेला हा विश्वविक्रम धरून तिसरा विश्वविक्रम ठरला आहे.


शिकवण महत्त्वाची...
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर तीन महिन्यांच्या आत त्यांनी घेतलेल्या उभारीबद्दल सांगताना, त्यांचा व त्यांच्या आईच्या भावनेचा बांध थांबवणे अशक्‍यप्राय होते. परंतु, वडिलांच्या शिकवणीनुसार ध्येयापासून हटायचे नाही, कोणत्याही प्रसंगात खचून जायचे नाही, ही शिकवण ध्यानी ठेवून आमच्या ध्येयाकडे वाटचाल चालू असल्याचे या दोघांचे मत आहे. वडील शरीराने जरी सोबत नसले, तरी विचाराने आयुष्यभर आमच्यासोबत असतील, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com