बिहार पोलिसः भाजपनंतर काँग्रेसची मुंबई पालिका आणि पोलिसांवर टीका

पूजा विचारे
Monday, 3 August 2020

बिहारचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वांरटाईन करण्यात आलं. त्यानंतर मुंबईत बरंच राजकारण तापलं आहे. भाजपसह काँग्रेसनंही मुंबई पालिकेला आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. 

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी तपासासाठी बिहारहून मुंबईत आलेल्या बिहारचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वांरटाईन करण्यात आलं. त्यानंतर मुंबईत बरंच राजकारण तापलं आहे. भाजपसह काँग्रेसनंही मुंबई पालिकेला आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. 

या मुद्दयावर भाजपसह काँग्रेसनं राज्य सरकारला घेरलं आहे. महाराष्ट्र सरकारला नेमकं काय सत्य दडवायचं आहे, असा सवाल भाजपनं केला आहे. तर आता या प्रकरणाचा तपास कसा होणार? मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं; अशी खोचक टीका काँग्रेसनं केली आहे. 

रविवारी विनय तिवारी हे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या विश्रामगृहात ते थांबले होते. महापालिकेला ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर जाऊन त्यांना  १४ दिवसांसाठी क्वांरटाईन केलं. तिवारी हे देशांतर्गत प्रवासी असल्याने नियमानुसार ही कार्यवाही करण्यात आल्याचं महापालिकेचं स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचाः  ठाण्याच्या रेतीबंदर पुलावर भीषण अपघात, कंटेनर थेट खाडीत

भाजपचं मुंबई महापालिका आणि राज्य सरकावर हल्लाबोल 

या प्रकारानंतर भाजपचे आमदार राम कदम आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरकारवर आणि मुंबई पालिकेवर निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. मुंबईत दररोज हजारो लोक येतात. याआधी बिहारचे काही पोलिसही आले होते. त्यापैकी कुणाला क्वॉरंटाइन केलं गेलं नाही. मग मोठ्या अधिकाऱ्यालाच क्वॉरंटाइन का केलं गेलं? मोठे अधिकारी या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि सत्य लोकांसमोर येईल. या भीतीपोटी त्यांना क्वॉरंटाइन केलं जात असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. 

महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसांना मोकळेपणानं काम करू देत नाही. मुंबई पोलिसांना मोकळेपणानं काम करू दिलं असतं तर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवा अशी मागणी देशभरातून झालीच नसती, असंही राम कदम म्हणालेत.

अधिक वाचाः मुंबई इज दी बेस्ट...कोरोना रुग्णांना मिळताहेत न्यूयॉर्क पेक्षा दर्जेदार सुविधा
 

किरीट सोमय्याचं पत्र

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना पत्रच लिहिलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कामानिमित्त ये-जा करणारे किती मंत्री, उद्योगपती, पोलिस अधिकारी आणि अन्य लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे याची यादी द्या, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

पुढे पत्रात सोमय्यांनी लिहिलं की, आयसीएमआरच्या पथकातील अधिकारीही मुंबई आणि महाराष्ट्रात अनेकदा येऊन गेले आहेत. त्यांनाही कधी क्वारंटाइन केलं गेलं नाही. मग बिहारच्याच पोलीस अधिकाऱ्याला का, अशी विचारणाही सोमय्या यांनी पत्रात केली आहे. तसंच तिवारी यांना तात्काळ क्वांरटाईन मुक्त करा, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपनंतर काँग्रेसची टीका 

भाजपनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही मुंबई पालिका आणि पोलिसांवर टीका केली आहे. निरुपम यांनी ट्विट करुन हा निशाणा साधला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की,  मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलंय. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलिस अधिकारी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाइन करण्यात आले आहे. चौकशी कशी होणार?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. तिवारी यांची सुटका करून त्यांना तपास कामात मदत करावी. नाही तर मुंबई पोलिसांवरील संशय वाढेल, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

bihar police officer qurantine issue sanjay nirupam Ram kadam Kirit Somaiya attack bmc mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar police officer qurantine issue sanjay nirupam Ram kadam Kirit Somaiya attack bmc mumbai police