दुचाकी खरेदीत १५ टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांकडून पसंती दिली जात असून, शहरातील वाहनविक्रीच्या दालनांमध्ये वाहनांचे बुकिंग जोमात सुरू आहे. विशेषत: दुचाकीच्या खरेदीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांकडून पसंती दिली जात असून, शहरातील वाहनविक्रीच्या दालनांमध्ये वाहनांचे बुकिंग जोमात सुरू आहे. विशेषत: दुचाकीच्या खरेदीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत माणसी एक खासगी वाहन असताना दुचाकी खरेदीचा वाढलेला वेग लक्षात घेता दसऱ्यानंतर शहरातील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने नव्या दुचाकींची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चारचाकी वाहनांची खरेदीही जोमाने सुरू असली, तरी ती मागील वर्षांइतकीच असल्याचे सांगण्यात येत आहे.

कमकुवत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रत्येकालाच शहरांतर्गत प्रवासासाठी स्वत:च्या वाहनाची आवश्‍यकता असते. सध्यस्थितीत प्रत्येक महिन्याला सातशेहून अधिक नव्या दुचाकींची शहरात भर पडत आहे. शहराच्या रस्त्यांवरील दुचाकी वाहनांची संख्या १० लाखांहून पुढे गेली आहे. तर आता दसऱ्याच्या मुहूर्तासाठी वाहनांच्या बुकिंगबाबत शहरातील काही दालनांतून माहिती घेतली असता, यंदा दुचाकींची विक्री झपाट्याने वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील वर्षीपेक्षा यंदा दुचाकींच्या विक्रीत वाढ आहे. मागणीबरोबरच खरेदीसाठी चौकशीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा ते दिवाळीपर्यंतही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे.
- नरेंद्र सोनावणे, दुचाकी वाहनविक्रेता.

दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी पासिंग करणाऱ्यासाठी पेपरदेखील जास्त आले असून, नेहमीपेक्षा या महिन्यात गाडी पासिंग करून घेण्यासाठीचे प्रमाण वाढले आहे.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bike purchase increases by five percent