रिक्षातून महिलांची बॅग हिसकावून मोटरसायकलस्वार पसार 

रिक्षातून महिलांची बॅग हिसकावून मोटरसायकलस्वार पसार 

मुंबई - विमानतळाकडे (टी-2) रिक्षाने जाणाऱ्या महिलेची बॅग चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी पोलिसांनी काही रिक्षाचालकांची चौकशी केली आहे. ही महिला मुंबईत आल्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरेल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चार दिवसांपूर्वी घडलेली ही घटना समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे नुकतीच उघड झाली. या महिलेच्या ओळखपत्रासह इतर वस्तू चोरीला गेल्याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. रिक्षा प्रवासात हा प्रकार घडल्याने विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा सुरक्षित आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या महिलेच्या पर्सची चोरी आणि चोरट्यांना पळून जाण्यासाठी काही रिक्षाचालकांनीही मदत केल्याचे दिसत असल्याने पोलिसांनीही गंभीर दखल घेतल्याचे कळते. 

सोनिया चांदोरकर या गुरुवारी (ता. 9) रात्री सुनेसह गोव्याला जात होत्या. त्यांनी विलेपार्ले येथून आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (टी-2) जाण्यासाठी रिक्षा पकडली. चालकाने जास्त भाडे सांगितल्यामुळे त्यांनी ती रिक्षा सोडून दुसरी रिक्षा घेतली. काही अंतर गेल्यानंतर मोटरसायकलवरून आलेले चोरटे त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळून गेले. या बॅगेत चांदोरकर यांचे पॅन कार्ड, बॅंक कार्ड, मोबाईल आदी वस्तू होत्या. बॅग चोरीला गेल्यामुळे धक्का बसलेल्या या दोघींनी सहार पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्या गोव्याला रवाना झाल्या. 

रिक्षाचालकांनी अडवला रस्ता? 
चोरीचा प्रकार घडला, तो परिसर निर्मनुष्य होता. पर्स हिसकावून पळालेल्या चोरट्यांचा पाठलाग करत असताना काही रिक्षाचालकांनी त्यांची रिक्षा रस्त्यात अडवलीही होती. याप्रकरणी आपण मंगळवारी (ता. 13) सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सोनिया चांदोरकर यांनी सांगितले. या घटनेची दखल घेऊन पोलिसांनी काही रिक्षाचालकांची चौकशी केल्याचे समजते. तक्रारदार महिला मुंबईत आल्यावर जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतर तपासाची दिशा ठरेल, असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com