"नो बिल... नो पेमेंट'मधून पाच लाख रुपयांची बिले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

रेल्वेच्या नव्या "नो बिल... नो पेमेंट' उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून पश्‍चिम रेल्वेवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांकडून खरेदीनंतर आतापर्यंत प्रवाशांना एकूण 5 लाख 80 हजार रुपयांची बिले देण्यात आली आहेत.

मुंबई : रेल्वेच्या नव्या "नो बिल... नो पेमेंट' उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून पश्‍चिम रेल्वेवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांकडून खरेदीनंतर आतापर्यंत प्रवाशांना एकूण 5 लाख 80 हजार रुपयांची बिले देण्यात आली आहेत. 9 जुलैपासून उपक्रमाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 80 हजार रुपयांची बिले प्रवाशांना देण्यात आली. 

ग्राहकांच्या अनेक तक्रारी आल्याने खाद्यपदार्थांसह विविध प्रकारच्या स्टॉलधारकांना बिल देणे अनिवार्य करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्याची कठोर अंमलबजावणी पश्‍चिम रेल्वेकडून केली जात आहे.
 
रेल्वेस्थानकांवर असलेल्या खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंच्या स्टॉलविरोधात जादा दर आकारणे, दर नियमित न ठेवणे आदींसह अन्य तक्रारी रेल्वे विभागाला आल्या होत्या. रेल्वे मंत्रालयाने स्टॉलवर ई-बिल देणारी पीओएस मशीन (पॉईंट ऑफ सेल) बसवण्याचे नुकतेच आदेश दिले. त्यानंतर 242 पैकी 232 स्टॉलमध्ये पीओएस मशीन बसवण्यात आल्या. त्यामध्ये "नो बिल... नो पेमेंट'ची कठोर अंमलबजावणी सुरू झाली. आतापर्यंत पश्‍चिम रेल्वेवरील स्टॉलधारकांकडून वस्तूच्या खरेदीनंतर प्रवाशांना एकूण 5 लाख 80 हजार रुपयांची बिले देण्यात आली आहेत. पश्‍चिम रेल्वे मार्गावर 9 जुलैला "नो बिल... नो पेमेंट' उपक्रम सुरू झाला. 

मेल-एक्‍स्प्रेसमधील कर्मचारी अथवा स्थानकावरील स्टॉलधारक जादाची रक्कम प्रवाशांकडून वसूल करू शकत नाहीत. बिल दिले नाही तर ग्राहकांनी खाद्यपदार्थ मोफत घेण्याचे आवाहन केले आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर आतापर्यंत एकूण 5 लाख 80 हजार रुपयांची बिले प्रवाशांना देण्यात आली आहेत. 
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bills Worth Rs 5 Lakhs From Mumbai's Railway Under "No bill... no payment" policy