
ऐन हंगामात चिकन विक्रेत्यांचे चिकन विकले गेले नसल्याने ते प्रचंड हवालदिल झाले आहेत. मात्र मटण मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
पाली - मार्गशीर्ष महिना गुरुवारी संपला शुक्रवारी (ता.15) किंक्रांत देखील आली. त्यामुळे खवय्यांच्या उड्या मांसाहारावर पडल्या असल्या तरी बर्ड फ्ल्यू मूळे खवय्ये मटण आणि मासळीला पसंती देत आहेत. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेत्यांचे चिकन विकले गेले नसल्याने ते प्रचंड हवालदिल झाले आहेत. मात्र मटण मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
पालीतील चिकन विक्रेते संतोष देशमुख यांनी सांगितले की कोरोनात प्रचंड नुकसान झाले. मग मार्गशीर्ष महिना संपल्यावर आत्ता कुठं हंगामाला सुरुवात झाली होती. किंक्रांतील खूप माल संपतो त्यामुळे सर्व तयारी करून ठेवली होती. मात्र दिवसभरात एकही कोंबडी विकली गेलेली नाही. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न आहे. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेत आहोत. पण बर्ड फ्ल्यूच्या भीतीने कोणीही चिकन घेत नाही. तर फिरोज तांबे या मटण विक्रेत्याने सांगितले की मटण खरेदीसाठी आता अधिक लोक येत आहेत. मटणाचे भाव वाढविले नाहीत पण जिल्ह्यात विविध ठिकाणी भावामध्ये तफावत आहे. सिराज खानदेशी या मासळी विक्रेत्याने सांगितले की पक्षांवर रोग आल्याने चिकनचे गिऱ्हाईक आता मासळीकडे वळले आहे. त्यामुळे धंदा चांगला होत आहे. मात्र मागणी अधिक असली तरी त्या प्रमाणात समुद्रात मासे सापडत नसल्याने भाव वाढले आहेत.
मुंबई, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
भाव जवळपास 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. परशुराम लेंडी या मासळी विक्रेत्याने सांगितले की बंदरावर टोपलीने घाऊक मिळणारी काही मासळी आता वजनावर दिली जात आहे. तर अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चिकन पेक्षा मटण खाण्याला पसंती देत आहे.
Birds Flu Effect meat and fishes price increase Decline of chicken business during Ain season
------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )