ठाणे जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर 927 ; जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

62 सोनोग्राफी केंद्रे, 55 गर्भपात केंद्रे, 150 नर्सिंग होम्सचा समावेश होता. या तपासणीत 51 आरोग्य संस्थांमध्ये आढळलेल्या किरकोळ त्रुटी नोटिसा देऊन दुरुस्त करून घेण्यात आल्या. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर 770 इतका खाली आल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नसून, सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम अहवालानुसार 2017 मध्ये मुलींच्या जन्माचा दर 927 इतका असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले आहे. पीसीपीएनडीटी कायद्यान्वये जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती अस्तित्वात आहे. तिच्या बैठकांसह सोनोग्राफी केंद्राच्या धडक तपासणी मोहिमा होतात, असेही त्यांनी म्हटले आहे. 

सरकारचा सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम या अधिकृत यंत्रणेत आरोग्यविषयक डाटा अद्ययावत केला जातो आणि तो आधारभूत मानाला जातो. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले की, 2017 मध्ये 15 मार्च ते 15 एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत प्रत्येकी पाच सदस्यांच्या सात समित्यांनी जिल्ह्यातील 267 खासगी आरोग्य संस्थांची तपासणी केली होती. त्यात 62 सोनोग्राफी केंद्रे, 55 गर्भपात केंद्रे, 150 नर्सिंग होम्सचा समावेश होता. या तपासणीत 51 आरोग्य संस्थांमध्ये आढळलेल्या किरकोळ त्रुटी नोटिसा देऊन दुरुस्त करून घेण्यात आल्या. 

रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवल्याने चार सोनोग्राफी केंद्रांविरुद्ध कोर्टात खटले दाखल करण्यात आले. दोन प्रकरणांतील केंद्रचालकांच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध कल्याण न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. एका सोनोग्राफी केंद्राला विनापरवाना कार्डीएक प्रोबची विक्री केल्याचे आढळल्याने निलंबित करण्यात आले आहे. 

मुलींचे प्रमाण (हजार मुलांमागे) 

2014- 935 
2015- 901 
2016- 915 
2017- 927 

Web Title: Birth of girls in Thane district 927 says District Surgeon