बीआयटी चाळी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईतील बीआयटी चाळींतील काही चाळी चांगल्या स्थितीत असूनही त्या धोकादायक असल्याचा स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल सादर करून, त्या पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचा, तसेच या चाळी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप आज स्थायी समितीच्या बैठकीत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला. 

बीआयटी चाळीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. त्या प्रस्तावावर सभागृहनेते जाधव बोलत होते. ते म्हणाले की, मी याच भागात राहतो. त्यामुळे कोणत्या चाळी चांगल्या स्थितीत आहेत आणि कोणत्या धोकादायक स्थितीत आहेत, याची मला माहिती आहे. मात्र, या चाळीतील इमारती धोकादायक असल्याची भीती निर्माण करून, त्या पाडून बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. 

स्ट्रक्‍चरल ऑडिटमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या इमारतींबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी सभागृहनेते जाधव यांनी केली. त्यावर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, सल्लागार व पालिकेचे कर्मचारी हे इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करीत आहेत. 45 टक्‍क्‍यांपर्यंतच्या श्रेणीत असलेल्या इमारतींची दुरुस्ती केली जाते. त्यापेक्षा जास्त टक्‍क्‍यांच्या श्रेणीत असलेल्या इमारतींना धोकादायक म्हणून सी-1 श्रेणीत टाकले जाते. त्यानुसार काम सुरू आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी समितीच्या बैठकीत दिले. 

Web Title: BIT Chal issue