पालघर साधू हत्येप्रकरणी भाजप आक्रमक; प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

तुषार सोनवणे | Wednesday, 18 November 2020

भाजप आमदार राम कदम यांनी याप्रकरणी अक्रोश यात्रेचे आज आयोजन केले होते. खार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सूटका केली. 

मुंबई - पालघर येथे दोन साधूंच्या हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राज्य सरकारने आवश्यक ती पावले उचलत प्रकरणाची चौकशी सुरू केली. भाजप आमदार राम कदम यांनी याप्रकरणी अक्रोश यात्रेचे आज आयोजन केले होते. खार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सूटका केली. 

पालघर येथे दोन साधूंची लाठ्या काठ्यांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. या संदर्भातील व्हिडिओ देशभरता व्हायरल झाले होते. त्यामुळे समाजमाध्यमांसह संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाची चौकशी करत काही पोलिसांना निलंबित केले. तसेच अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु ही चौकशी कमी आहे असे भाजप आमदार राम कदम यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आज याप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी केली आहे. यात्रा काढण्याआधीच खार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली आणि यात्रा काढू दिली नाही. राम कदम यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपनेते नारायण राणे देखील पोलिस ठाण्यात दाखल झाले.

हेही वाचा - कंगनाच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलिसांकडून अभिनेत्रीला तिसऱ्यांदा समन्स

Advertising
Advertising

यावेळी राम कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पालघर येथे झालेल्या साधू हत्याकांडामुळे देश हादरला आहे. मध्यंतरी कोरोना काळामुळे याप्रकरणावर लोक रस्त्यावर उतरू शकले नाहीत. आता यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात लोक रस्त्यावर उतरतील. सरकारच्या नाकर्तेवपणाबाबत प्रश्न विचारतील. हे प्रकरण राज्य सरकारने सीबीआयकडे सोपवावे.अशी आमची मागणी आहे. 

पोलिसी बळाचा वापर करत आमच्या जनआक्रोश यात्रेला थांबवण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. आम्हाला त्या ठिकाणी जाऊद्या ज्या ठिकाणी साधूंना ठेचून मारण्यात आले होते. त्याठिकाणी जाऊन आम्हाला दिवे पेटवायचे आहेत. त्याठिकाणी दिवे पेटवने गुन्हा आहे का? 212 दिवस होऊनही राज्य सरकार यावर काही कठोर पावले उचलत नाही. येत्या काही दिवसांत याप्रकरणी रस्त्यावर संघर्ष होईल. साधूंच्या हत्येवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि अन्य पक्षाचे नेते त्याठिकाणी ते उपस्थित होते असे गंभीर आरोप राम कदम यांनी यावेळी बोलताना केले.

राम कदम यांच्या सोबत भाजपनेते नारायण राणे देखील उपस्थित होते. राणे म्हणाले की, 'कोरोना काळात तुम्हाला याप्रकारे आंदोलन करता येणार नाही. असे पोलिसांनी म्हटले आहे.तरी देखील राम कदम यांच्या आंदोलनाला आमचे समर्थन आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवायला हवी. ज्यांनी लोकांशी गद्दारी करून कॉंग्रस सोबत सत्ता स्थापन केली. हिंदूत्वाला सोडलेणाऱ्यांकडून हिंदू साधूंच्या हत्येबाबत सखोल चौकशीची अपेक्षा नाही',  नारायण राणे यांनी केली. 

हेही वाचा - वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही; प्रविण दरेकर यांचा सरकारला इशारा

राम कदम यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही समर्थन दिले. 'पालघरला जी साधु-संतांची हत्या झाली त्या संदर्भात आवाज उठवणं, न्याय मागणं सुद्धा ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. लोकप्रतिनिधी राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर या ठिकाणी पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतलं. यातूनच राज्यामध्ये जुलमी राजवट या ठिकाणी सुरु आहे याच पुन्हा एकदा प्रत्यंतर या ठिकाणी दिसून येतं. परंतु तुम्ही कितीही मुस्काटदाबी करा, कितीही लोकांना अटक करा, या राज्यामध्ये साधु-संतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा आणि महाराष्ट्र प्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील, आपल्याला जाब विचारत राहतील.' असे दरेकर यावेळी म्हणाले