ओवेसींनी धर्माच्या नावावर मते मागितली- भाजप

महेश पांचाळ
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. कुणीही उठतो आणि कोर्टात जातो. भाषावार प्रांतरचनेवर राज्याची निर्मिती झाली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

मुंबई : जातिधर्माच्या नावावर मते मागता येणार नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन काही तास पूर्ण होत नाहीत तोपर्यंत भाजपने 'MIM'चे नेते ओवेसी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

लोकसंख्येच्या आधारावर मुंबई महापालिकेचे बजेट मुस्लिम धर्मीयांना मिळावे असे भडकावू वत्कव्य करणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांची चौकशी करावी अशी तक्रार मुंबई भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. जाती, धर्म आणि भाषेच्या नावावर मते मागता येणार नाहीत असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडे आता तक्रारी येऊ लागल्या आहेत.

नागपाडा येथे गेल्या रविवारी रात्री ओवेसी यांनी घेतलेल्या सभेत लोकसंख्येच्या आधारावर मुस्लिमांना महापालिका बजेटची टक्केवारी मिळावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात मुंबई भाजपचे महामंत्री सुमंत घैसास यांनी खासदार ओवेसी यांच्या वत्कव्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. ओवेसी यांचे वक्तव्य समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. जातीय सलोखा बिघडवणारे आहे. तसेच मुस्लिमांचे नुकसान करणारे आहे, असे आयोगाच्या तक्रारीत म्हटले आहे.

आम्हाला कुठलीच टक्‍केवारी मान्य नाही. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी टक्केवारी मागणाऱ्या ओवेसीचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सबका साथ सबका विकास हाच भाजपचा नारा आहे, अशी डोकी भडकविणाऱ्या वक्तव्याची चौकशी होऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
 

Web Title: bjp complains against owaisi