भाजपचा नगरसेवक निघाला फाईलचोर

दिनेश गोगी
शनिवार, 12 मे 2018

वाढदिवसाच्या रात्री क्लिप व्हायरल, पद रद्द करण्याच्या सर्व स्तरातून मागणी 

उल्हासनगर - पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिनमध्ये जाऊन फाईल चोरणाऱ्या भाजपच्या स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी याच्या कारनाम्याचा पर्दाफाश सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे 10 तारखेच्या दुपारची ही क्लिप रामचंदानी याचा वाढदिवस असलेल्या 11 तारखेला रात्री उशिरा व्हायरल झाली आहे. हा प्रकार व्हायरल झाल्याने संपूर्ण उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली. 

पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता महेश सितलानी यांनी फाईलचोर नगरसेवक प्रदिप रामचंदानी याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली आहे. 

सुसंस्कृत असा दिंडोरा पिटणाऱ्या भाजपासाठी ही शरमेची आणि मान खाली घटना असून रामचंदानी याचे नगरसेवकपद आयुक्तांनी तडकाफडकी रद्द करावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनीसुद्धा रामचंदानी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी उचलून धरली आहे. तसेच, उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवाणी, परमानंद गेरेजा आदींनी महापौर मीना आयलानी यांना निवेदन दिले असून त्यात रामचंदानी याचे नगरसेवक पद रद्द करण्याचे मागणी केली आहे. 

10 तारखेला दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी प्रदिप रामचंदानी, ठेकेदार शशांक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जितू चोईथानी, नागदेव हे कॅबिन मध्ये चर्चा करत होते. ही  दुपारच्या जेवणाची वेळ होती. काही मिनिटांनी सर्व बाहेर गेल्यावर रामचंदानी कॅबिन मध्ये येतो आणि कपाटातील फाईल काढून आणि ती फोल्ड करून शर्टाच्या आत लपवतो.
 

Web Title: The BJP corporator is thief