वाढीव वीज बिलाविरोधात भाजपकडून राज्यव्यापी होळी आंदोलनाची हाक

पूजा विचारे
Friday, 20 November 2020

वाढीव वीज बिलाविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप येत्या २३ तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईः  वाढीव वीज बिलाविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप येत्या २३ तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी हे आंदोलन असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीज बिलासंदर्भात सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आणखीन आक्रमक झाला आहे. भाजपकडून सोमवारी राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी २३ नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षातर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

अधिक वाचा-  ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी; भाजपचा टोला
 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीजबिलांबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजप वीजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.

लॉकडाऊन काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे केलं आहे.

BJP hold statewide agitation November 23 against the increased electricity bill


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP hold statewide agitation November 23 against the increased electricity bill