ठरवून केलेली भाववाढ निषेधार्ह खासगी टॅक्सी कंपन्यांना फायदा, भाजपची टीका

ठरवून केलेली भाववाढ निषेधार्ह खासगी टॅक्सी कंपन्यांना फायदा, भाजपची टीका

मुंबई: रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तब्बल तीन रुपयांची भाडेवाढ करून सरकारने मुंबईकरांना त्रास देण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अन्यथा भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 

अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांवर अधिकचा आर्थिक बोजा टाकण्याचे काम ठाकरे सरकार करीत आहे. कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सरकारने हा प्रकार केला आहे. यामुळे ओला उबेर सारख्या खासगी टॅक्सीना फायदा होईल, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी पेट्रोलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करीत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या भाडेवाढीचा पेट्रोल- डिझेलच्या दरातील वाढीशी काहीही संबंध नाही. 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्री परब यांनी खटूआ समितीच्या शिफारसी राज्य सरकारने स्वीकारल्या असून भाडेवाढ होणार हे निश्चित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोरोनाच्या अगोदरच भाडेवाढ करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले होते, त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे. आपले ग्राहक कमी होतील त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भाडेवाढीला आमचा विरोध असेल असे रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी स्पष्टपणे सांगून सुद्धा ही अन्यायकारक भाडेवाढ करण्यात आली आहे. यातून ओला उबेर सारख्या खाजगी कंपन्यांचे ग्राहक वाढून त्यांनाच फायदा होईल, असा दावाही भातखळकर यांनी केला. 

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कोरोनाच्या काळात आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या काळात सामान्य मुंबईकरांना एका रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने आता सामान्य मुंबईकरांचा शिल्लक असलेला खिसा सुद्धा रिकामा करण्याचा घाट घातला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. ही भाडेवाढ तात्काळ मागे न घेतल्यास जनआंदोलन केले जाईल, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP leader Atul Bhatkhalkar criticism on rickshaw and taxi fare hike

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com