पंकजा मुंडे यांचा भाजपला पुन्हा धक्का; ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे नाव गायब

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

पंकजा यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले आहे. यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : भाजपच्या माजी आमदार व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आधीच खळबळ निर्माण केली होती. त्यात पुन्हा त्यांनी भाजपला गोंधळात टाकले आहे. पंकजा यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले आहे. यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Image may contain: 2 people, people smiling

विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा बीडमधून पराभव झाला होता. त्यांचे बंधू व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. पंकजा यांचा पराभव हा भाजपसाठी अत्यंत धक्कादायक होता. सत्तानाट्यात त्या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. यानंतर काल त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सागंतिले की, 12 डिसेंबरला आपण भेटू, मला तोपर्यंत वेळ हवा आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला त्या काय खुलासा करणार याची उत्सुकता असतानाच त्यांनी आता ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे नाव हटविल्याने पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. 

Image may contain: 2 people, text

यापूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर माजी महिला बाल कल्याण विकास मंत्री, नेत्या, भाजप असे पद लिहिण्यात आले होते. आता मात्र असे काहीच नसून, केवळ भाजप नेत्या असाही उल्लेख ट्विटर अकाऊंटवर दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. हेच त्यांचे ताजे ट्विट आहे. 

12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते, याच दिवशी पंकजा त्यांच्या पुढील निर्णयाबाबत बोलणार आहेत. तर आता ट्विटरवरून भाजपचे नावच हटविल्याने त्या आता काय पवित्रा घेतात याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Pankaja Munde have removed BJP s name from bio of Twitter