मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचा हल्लाबोल

पूजा विचारे
Sunday, 26 July 2020

या मुलाखतीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलीय. ट्विट करुन त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ही मुलाखत द्वेष आणि असूयेचा अंक होता, अशी टीका भाजपनं केली आहे. 

मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराला जाण्यापासून ते राज्यातील राजकीय विषयांवर परखड मत व्यक्त केले आहे. या मुलाखतीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलीय. ट्विट करुन त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ही मुलाखत द्वेष आणि असूयेचा अंक होता, अशी टीका भाजपनं केली आहे. 

या मुलाखतीत ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, तसंच त्यावरुन राज्यात सुरु असलेलं राजकारण आणि विरोधीपक्षाची भूमिका यावर आपलं मत व्यक्त केलं. आता त्यावरून पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झालीय.

आपल्या ट्विटमध्ये दरेकर यांनी लिहिलं की,  या मुलाखतीत द्वेष आणि असूयेचा दुसरा अंक पाहायला मिळाला. पहिला अंक हा शरद पवार साहेबांची मुलाखत होता. पण या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांची ताकद काय आहे आणि सरकार कसे हलले आहे हे दर्शवते. 

या आधी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपनं मुलाखतीवर टीका देखील केली होती. 

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकीच- मुख्यमंत्री

राज्यातील सरकार तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकीच आहे. रिक्षाच आहे ती गरीबांची. तीन चाकी तर तीन चाकी. पण स्टिअरिंग माझ्याच हाती आहे, पाठीमागे दोघे बसले आहेत. आमच्या सरकारचं मस्त चाललंय, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

हेही वाचाः नाहीतर तो प्रकल्प मी रद्द करेन, मुख्यमंत्र्यांकडून भाजपला मोठा हादरा

हे तीन चाकी सरकार आहे, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.

bjp leader pravin darekar criticizem cm uddhav thackeray saamana interview with sanjay raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader pravin darekar criticizem cm uddhav thackeray saamana interview with sanjay raut