भाजपने 12 लाख मतदार गायब केले- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

येथे 'काम की बात' चालते
मुंबई कॉस्मोपॉलिटन असली तरीही येथे भूमिपुत्रांचा म्हणजे मराठी माणसांचाच पगडा राहिला. देशाचा कौल काय आहे ते मुंबई-ठाण्याच्या जनतेने स्पष्ट केले. येथे 'मन की बात' चालत नाही तर फक्त 'काम की बात' चालते. शिवसेनेने मुंबईचा विकास आणि संरक्षण सदैव केले, असे 'सामना'त म्हटले आहे. 

मुंबई- 'शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत 84 पेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. पण ते का झाले नाही याची कारणे तपासावी लागतील. मुंबईतील 12 लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून 'ठरवून' झाला काय?,' असा सवाल शिवसनेने उपस्थित केला आहे. 

मुंबईमध्ये शिवसेनेचे 84, तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर कोणाचा होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर महापौर आमचाच होणार असे सांगत राजकीय परिस्थिती पाहून शिवसेनेने 'सामना'मधून भाजपवर शरसंधान केले आहे. 

हा कौल सेनेच्या बाजूने...
सेनेने म्हटले आहे की, 'मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व आणि मुसंडी महत्त्वाची आहे. जे झाले ते झाले, गंगेला मिळाले म्हणून वाहत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांतली शिवसेना नक्कीच नाही. महापालिका त्रिशंकू दिसत असली तरी मुंबईकरांचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने आहे. 

लढाई सुरूच राहील!
काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत आला. आता ही ऊब भाजपला मिळत आहे. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामांची पर्वा आम्ही करीत नाही. लढाई सुरूच राहील. युद्धाला तोंड फुटले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आणि विचारांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच!

हे सत्ता, संपत्तीचे बळ
भारतीय जनता पक्षाने सत्ता आणि संपत्तीच्या बळावर नक्कीच मुसंडी मारली आहे. पण जंग जंग पछाडूनही त्यांना शिवसेनेचा पराभव करता आला नाही. भाजप सेनेच्या पाठोपाठ आला, पण 'महाराष्ट्रा'ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेनेचा पराभव करता नाही. हा लढा अस्मितेचाच होता.
 

Web Title: bjp manipulated voters lists, blames shiv sena