मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले, आदित्य ठाकरेंना भाजपचा टोला

कृष्णा जोशी
Wednesday, 23 September 2020

पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात आणि ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई: मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या  पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात आणि ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल  भागात पाणी साचले, उपनगरी रेल्वेसेवांवरही परिणाम झाला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई महापालिकेने या पावसातही पुन्हा मुंबई तुंबून दाखवली. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच ही वेळ आली आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यासंदर्भात केली आहे. ही टीका करणारा व्हिडिओ त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. 

नालेसफाईत टक्केवारी, कोविड सेंटरमध्ये टक्केवारी, खुद्द महापौरांवर आरोप, अशा प्रकारे भ्रष्टाचाराने लडबडलेल्या महापालिकेच्या कारभारामुळेच सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर घालणारी ही परिस्थिती उद्भवली आहे, असे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.  

यंदाच्या पावसाळ्यात यापूर्वीही किमान दोन ती वेळा मुंबईत असे पाणी तुंबले होते. उपनगरातील रहिवाशांचे असे हाल सुरु असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे उपनगरांचा पहाणी दौरा करायला तयार नाहीत. ते पर्यटनात तसेच ताजमहाल पंचतारांकित हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत. पुराचा फटका बसलेल्या सर्व कुटुंबांना निदान प्रत्येकी दहा हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी मी मागील पुराच्या वेळी केली  होती. ती प्रशासनाने तेव्हा मान्य केली नाही, निदान आतातरी ठाकरे यांनी उपनगरांचा दौरा करून परिस्थितीची स्वतः पहाणी करावी आणि नुकसानग्रस्तांना वरील मदत द्यावी, अशी मागणीही भातखळकर यांनी पुन्हा केली आहे.

------------------

(संपादनः पूजा विचारे) 

BJP MLA Atul Bhatkhalkar attack on Aditya Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar attack on Aditya Thackeray