दरेकर यांच्या जनसंपर्क अभियानामुळे मागठाण्यात 'संशयकल्लोळ'

दरेकर यांच्या जनसंपर्क अभियानामुळे मागठाण्यात 'संशयकल्लोळ'

मुंबई ः मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व भाजपचे विधानपरिषदेतील मातब्बर आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे आमदार असलेल्या आपल्या घरच्या मागठाणे मतदारसंघात धडाकेबाज जनसंपर्क अभियान सुरु केल्यामुळे त्यांचे इरादे नेमके काय आहेत, याबाबत तेथे संशयकल्लोळ नाट्य सुरु झाले आहे. 

मतदारसंघात भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न असे या अभियानाचे स्वरुप आहे. विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये असून मुंबईत विविध ठिकाणी अनेक इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात अंतर्गत बांधणी वा कामे सुरु केली आहेत. मात्र यापैकी कोणीही दरेकरांप्रमाणे उघडपणे हालचाली सुरु केल्या नाहीत. सध्या शिवसेना भाजप युती असून मागठाणे मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेचा दावा असूनही दरेकर ज्या आत्मविश्वासाने हे अभियान राबवीत आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात विविध तर्क लढविले जात आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे उभ्या राहिलेल्या दरेकरांना तेहतीस हजार मते मिळाली होती. तर भाजप उमेदवाराला 45 हजार मते मिळाली होती. या मतविभागणीमुळे दरेकर पराभूत होऊन 65 हजार मते घेणारे सुर्वे विजयी झाले होते. तर आताच्या लोकसभा निवडणुकीतही दरेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे मागठाण्यातून भाजपला 72 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथे भाजपचे वर्चस्व अद्याप कायम असल्याचे चित्र असून त्याचा फायदा घेण्याचा दरेकर यांचा प्रयत्न आहे. त्यातच दरेकर भाजपमध्ये गेल्यावर त्यांना मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले.

दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध वापरून केवळ मतदारसंघातीलच नव्हे तर मतदारसंघाबाहेरीलही अनेक कामे केली. शालेय आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्यांनी अशीच धडपड केली. आता गेल्या विधानसभा निवडणुकीतील हुकलेली बेरीज ते यंदा जुळवून आणतात का व त्यासाठी ते काय डावपेच खेळतात, याची चर्चा येथे आहे. 

लोकांची कामे करण्यात काहीही चूक नाही. आपण पक्षशिस्त वा युतीधर्मही मोडला नाही व कधीही मोडणारही नाही. अद्याप युतीतील कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची हे ठरले नाही, भविष्यात काहीही होऊ शकते. भाजपला येथे जनाधार असल्याने उद्या भाजप देखील या जागेवर दावा करू शकतो. दोनही पक्षांनी समजुतीने ही जागा भाजपला दिली तर पक्षाची तयारी असावी, यासाठी मी हे प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आपण पाळू, असे प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात सकाळला सांगितले. अर्थात तरीही अंतिम क्षणी परिस्थिती कशी बदलेल याबाबत येथे अनिश्चितता आहे. येथे उमेदवार आयात करण्याचा पालघर फॉर्म्यूला वापरला जाईल का, युतीत ही जागा कोणत्या पक्षाला जाईल, राज्यभरातच काही मतदारसंघात अदलाबदल झाली तर त्यात दहीसर, गोरेगाव याचबरोबर मागठाण्याचा नंबर लागेल का, याबाबतचा सस्पेन्स दरेकर यांच्या जनसंपर्क अभियानामुळे वाढल्याची चर्चा येथे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com