भाजपलाही झाली मराठीची आठवण ! 

BJP
BJP

उत्तर भारतीय भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी 

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी "मी मुंबईकर'चे कॅम्पेनिंग केले असले तरी, 227 पैकी 192 प्रभागांमध्ये कमळ निशाणी फुलणार असून, सुमारे 117 मराठी उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात मुंबई भाजपने उत्तर भारतीयांचे मेळावे घेऊन उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्यामुळे, भाजपच्या यादीत उत्तर भारतीय चेहऱ्यांना स्थान दिले जाईल, अशी अटकळ होती. मात्र, भाजपकडून मुंबईत मराठीचा गजर केला जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. मुंबईत मराठी मतदार 26 टक्के उरले असले तरी, शिवसेनेने भाजपबरोबर युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे, तो मराठी मतदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, या विश्‍वासावरच. त्यामुळे, महाराष्ट्रातील मतदारांमध्ये भाजपबाबत चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, निवडणूक प्रचारात सेना मनसेकडून मराठी कार्ड वापरण्याचा प्रयत्न होईल त्यावेळी आम्ही जास्तीत जास्त मराठी उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट दिले, अशी बाजू मांडण्याचे भाजपच्या प्रचार समितीने ठरविल्याचे समजते.
 
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मराठी माणसांची सहानुभूती राहिलेली आहे. परंतु, त्यावेळी प्रमुख विरोधात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार यादीकडे नजरा लागत होत्या. बहुसंख्य अमराठी उमेदवारांना कॉंग्रेसकडून पूर्वीच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्याची उदाहरणे असून, त्याचे सेनेकडून भांडवल केले जात असायचे. त्यामुळे, आम्हीही मराठीच आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न मुंबई भाजपकडून केला जात आहे. त्यातून सेना मनसेतून भाजपत प्रवेश केलेल्यांना तात्काळ उमेदवारी देण्यात आली आहे. सेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या दोन्ही मुलींना तिकीट देण्यात आले आहे. सेना नगरसेवक नाना आंबोले, बबलू पांचाळ, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे,विक्रोळीचे मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, मनसेच्या नगरसेविका शिल्पा चोगले यांनाही तिकीट देण्यात आले आहे. 

मराठी मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असताना, उत्तरभारतीय भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून,मात्र ते उघडपणे बोलून दाखवत नाहीत .दादर, माटुंगा, विलेपार्ले, कांदिवली, धारावी, ऍन्टॉप हिल भागातील भाजप कार्यकर्ते नाराज आहे. उत्तरभारतीयांचे प्राबल्य असलेल्या किमान 52 जागांवर उत्तरभारतीय उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, 29 उत्तरभारतीय चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. खासदार किरीट सोमय्यांनी आपल्या मुलाला तिकीट पदरात पाडून घेतले. त्यामुळे उत्तरभारतीयांचा रोष हा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार सोमय्या यांच्यावर असल्याचे सूत्रांकडून समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com