भाजपची मदार आयारामांवर

दीपक शेलार - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासल्याने निष्ठावान नाराज झाले आहेत...

ठाणे - ठाणे पालिकेचा सत्तेचा सोपान चढण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले होते. परिणामी या निवडणुकीत भाजपने उभे केलेल्या १२० उमेदवारांपैकी तब्बल ६२ उमेदवार आयात केले आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात अनेक नवख्यांना बाशिंग बांधून निवडणुकीच्या बोहल्यावर चढवल्याने ठाण्यात भाजप बॅकफूटवर पडल्याचे चित्र आहे. एकीकडे उपऱ्यांना उमेदवारीची खिरापत वाटणाऱ्या भाजपने रिपब्लिकनला (आठवले गट) वाऱ्यावर सोडले आहे. दरम्यान, काँग्रेसमुक्त भारताची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासल्याने निष्ठावान नाराज झाले. त्याचे पडसाद प्रचारात उमटत आहेत.  

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने ठाण्यात मोठ्या प्रमाणात आयारामांना लाल गालिचा अंथरला. अनेक वर्षे सतरंज्या उचलत पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या; तसेच तळागाळात कमळ फुलवण्यासाठी वर्षानुवर्षे खस्ता खाणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे पक्षात कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध आयाराम अशी दुही माजून त्याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावर होत आहे. निवडणुकीत भाजपने १३१ पैकी १२० जागांवर उमेदवार उभे केले असून युती करणाऱ्या रिपब्लिकनच्या सहा उमेदवारांसमोर  उमेदवार उभे करून त्यांचा विश्वासघात केला आहे. 

Web Title: bjp politics in thane

टॅग्स