मलमपट्टीसाठी ‘मातोश्री’वर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. ६) मुंबईत येणार असून, या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा ‘मातोश्री’वर संध्याकाळी सहाच्या सुमारास उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी ते ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत आल्यावर प्रत्येक वेळी शिवसेनेबरोबर चर्चा करण्यास टाळाटाळ करणारे अमित शहा ‘मातोश्री’वर जाणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध ताणले होते. उद्धव हे युती तोडतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, तसं काही झालं नाही. भाजप मात्र कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर जाताना दिसत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अमित शहा गुरुवारी (ता. ७) अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी शहा यांनी अन्य घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. त्यात रामविलास पासवान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि जम्मू- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश आहे.

नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
गेल्या अनेक दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष भाजपवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे दिसतही होती. तसेच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. तसेच शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता नाराज शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करणार आहेत.

देशाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडगोळीची गरज नाही. मात्र, देशातील जनता काँग्रेस किंवा जेडीएस नेते एचडी देवेगौडा यांना मते देऊ शकते. शिवसेना ‘एकला चलो रे’ची भूमिका बदलेल असे मला वाटत नाही
संजय राऊत, शिवसेना खासदार

Web Title: BJP President Amit Shah will meet Shiv Sena Uddhav Thackeray in Mumbai