शिवसेना भवनासमोर भाजपची जोरदार निदर्शने; शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप

कृष्ण जोशी | Sunday, 13 September 2020

कांदिवलीचे माजी नौसैनिक मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचा विषय पेटताच ठेवण्याचे भाजपने ठरवले असून आज पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई विभागातर्फे दादरच्या सेनाभवनावर निदर्शने करण्यात आली

मुंबई - कांदिवलीचे माजी नौसैनिक मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचा विषय पेटताच ठेवण्याचे भाजपने ठरवले असून आज पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई विभागातर्फे दादरच्या सेनाभवनावर निदर्शने करण्यात आली. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त असल्याने आजुबाजूच्या परिसरातील शिवसैनिकांना हात बांधून स्वस्थ बसावे लागले. 

मारहाणीचे राऊतांकडून समर्थन, हा बेशरमपणाचा कळस भातखळकर यांची टीका

भाजपचे दक्षिण मध्य मुंबई विभाग अध्यक्ष राजेश शिरवडकर तसेच माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, माजी अध्यक्ष विलास आंबेकर आदींसह कित्येक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी शिवसेनेच्या तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. काल या विषयावर कांदिवलीत भाजपने जोरदार निदर्शने केली होती, मात्र आजच्या निदर्शनांमुळे हा विषय पेटता ठेवण्याचे  भाजपने ठरविले असल्याची प्रतिक्रियाही यानिमित्ताने नागरिकांनी व्यक्त केली. 

३६ मिनिटांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर

परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवसेना घेते. पण त्यांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेने नुकतेच अभिनेत्री कंगना राणावत या महिलेचे घर उध्वस्त केले, हीच शिवसेनेची मर्दुमकी आहे, त्यांना एवढेच येते, अशी बोचरी टीका जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी यावेळी केली. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या भयावह गतीने वाढत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेची गुंडगिरी वाढते आहे, महिला सुरक्षित नाहीत, सरकारने पोलिसांना वाऱ्यावर सोडले आहे, हेच या सरकारचे कर्तृत्व आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवंणे )