विकास आराखड्यांवरून आज खडाजंगीची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - शिवसेना-भाजपच्या महापालिकेतील संघर्षाला आता सुरुवात होणार आहे. महासभेत शुक्रवारी (ता. 17) विकास आराखडा सादर केला जाणार आहे. त्यावर तत्काळ चर्चा होण्याची शक्‍यता कमी असली तरी ती वादळी ठरणार आहे. 

महापालिकेला 20 मार्चपर्यंत चर्चा करून 2014 ते 2034 या 20 वर्षांचा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवायचा आहे. हा विकास आराखडा महासभेत सादर केला जाणार आहे. एवढ्या कमी कालावधीत विकास आराखड्यावर चर्चा होणे अवघड असल्याने शिवसेना पुन्हा मुदतवाढीची मागणी करू शकते. काहीही झाले तरी शिवसेना-भाजपमधील वादाचा पहिला भडका विकास आराखड्यावरून उडणार असल्याचे दिसत आहे. महापालिकेत 155 नवे नगरसेवक आहेत. त्यांना या आराखड्याचा अभ्यास करून भूमिका मांडायची असल्याने मुदतवाढीची मागणी करण्यात येणार आहे. आराखड्यात आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी आरक्षण प्रस्तावित आहे. त्याला शिवसेनेचा विरोध आहे. मेट्रो हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यामुळे आरे वसाहतीबरोबरच अनेक मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी उडणार आहे. 

Web Title: bjp- shiv sena development plan issue