सोशल मीडियावर भाजप "ट्रोल' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

भाजपला सोशल मीडियावर ट्रोल केले; तर अनेकांनी टीकात्मक पोस्ट केल्या आहेत. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. याची नेटकऱ्यांनी चांगलीच दखल घेतली असून अनेकांनी भाजपला सोशल मीडियावर ट्रोल केले; तर अनेकांनी टीकात्मक पोस्ट केल्या आहेत. 

"भाजप प्रवेश देणे सुरू आहे, अट- ईडी, इन्कम टॅक्‍स नोटीस आलेल्यांना प्राधान्य' असा बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. "...सोनेरी हरणाचे फताडे फताडे पाय, आमचे हे दिसत नाही, भाजपमध्ये गेले की काय...' सोशल मीडियावर राजकीय नेत्यांच्या बायकांचा हा उखाणा फारच व्हायरल झाला आहे... "साहेब, आमदारांची खरेदी टॅक्‍स फ्री आहे का... की नेत्यांचं ट्रेडिंग फ्री आहे...?' मुख्यमंत्र्यांना असा सवाल विचारणारी पोस्टही नेटकऱ्यांच्या पसंतीत उतरले आहे; तर "संध्याकाळी सरळ घरी ये, नाहीतर जाशील भाजपात' अशा प्रकारच्या मेसेजमधून नेटकऱ्यांनी भाजपला "ट्रोल' केलं आहे; तर हाताच्या पाच बोटांच्या पाकळ्या असलेलं कमळही फारच व्हायरल झालं आहे. 

भाजप-शिवसेनेला "अच्छे दिन' आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच विषयावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या असून नेटकऱ्यांनी शिवसेनेपेक्षा भाजपला अधिक "ट्रोल' केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp trolls on social media