शिवसेनेच्या डझनभर आमदारांवर भाजपची नजर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - सतत होणाऱ्या विरोधाला कंटाळून शिवसेनेबरोबर शेवटची चर्चा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रीतिभोजनाचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतरही शिवसेना विरोधकाच्याच भूमिकेत राहिली; तर मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेनेचे डझनभर आमदार गळाला लावण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मात्र या अफवा असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेच्या सततच्या विरोधाला भाजप आता कंटाळली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीमध्येही शिवसेनेला बाजूला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापूर्वी एक संधी देण्यासाठी भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी (ता. 30) "मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सर्व प्रयत्नांनंतरही शिवसेना सत्ताधाऱ्यांसारखी न वागल्यास नवे गणित जुळवण्याचे भाजपने ठरवले आहे. कॉंग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 14 आमदार फोडण्याची तयारीही भाजपने केली आहे. हे आमदार भाजपमध्ये आल्यास पोटनिवडणुका होतील. त्यांना पुन्हा निवडून आणावे लागेल. त्यावर अजित पवार यांनी या फुटलेल्या आमदारांविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एकच उमेदवार उभा करण्याचा इशारा दिला आहे.

ठाण्यात फूट पडणे अशक्‍य
ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या दराऱ्यामुळे तेथील आमदार फुटण्याची शक्‍यता कमीच आहे. फुटलेला आमदार निवडून येण्याची शक्‍यताही कमी असल्याने तेथील आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही. मात्र, मुंबईसह राज्यातील सर्वच भागांतील प्रत्येकी दोन-चार आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप करण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp watch on shivsena mla