भाजप 192 जागा लढवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद आणि एक वैधानिक समिती देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले आहे...

मुंबई - महापालिका निवडणुकीत शिवसेनेने काडीमोड घेतल्यानंतर भाजपने रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्षांना एकत्र आणून महायुतीची घोषणा केली आहे. भाजप 192 जागा लढवणार आहे, तर मित्रपक्षांना 35 जागा सोडण्यात आल्या आहेत. रिपब्लिकन पक्षासाठी महापौरपदाची मागणी करणाऱ्या रामदास आठवले यांची उपमहापौरपदावर बोळवण केली आहे.

रिपब्लिकन पक्षाला 25, राष्ट्रीय समाज पक्ष 6 आणि शिवसंग्राम पक्षाला 4 जागा देण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी (ता. 3) पत्रकार परिषदेत केली. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. आठवले म्हणाले की, 1992 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने रिपब्लिकन पक्षाचा महापौर होणार, अशी घोषणा केल्यानंतर युतीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर पक्षाला पहिल्यांदाच महापौरपद मिळाले होते. आता महापौरपद मिळणार नसले तरी उपमहापौरपद आणि एक वैधानिक समिती देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले आहे, असेही त्यांनी सांगतानाच अजून पाच ते सात जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्‍त केली.

महापालिकेच्या 227 जागांपैकी 192 जागा भाजप लढवणार आहे. महायुतीतील इतर पक्षांसाठी मित्रपक्षांना युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. रिपब्लिकन पक्षाने 70 जागांची मागणी केल्याने महायुतीतील इतर तीन पक्ष भाजपपासून दुरावण्याची चिन्हे होती. त्यानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी मध्यस्थी करून महायुतीसाठी रामदास आठवले, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांच्याबरोबर यशस्वी वाटाघाटी केल्या. महापौरपद सोडण्याची भाजपने तयारी दाखवली असती तर शिवसेना-भाजपची युती तुटलीच नसती. महापौरपदावर तुम्ही दावा करू नका. त्या बदल्यात उपमहापौरपदाबरोबर एक वैधानिक समिती देण्याची तयारी दाखवून आठवले यांची समजूत काढली.

रासप, शिवसंग्राम नाराज
रिपब्लिकन पक्षाचा मान राखताना राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली. तसेच वैधानिक समिती मिळावी, अशी गळ भाजपला घातली. शिवसंग्रामच्या प्रतिनिधीने समाधानी आहे; पण संतुष्ट नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्‍त केली.

Web Title: BJP will contest 192 seats in bmc