ईव्हीएम हटवले तर भाजप सरकार पडेल - राज ठाकरे  

संजय शिंदे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

लोकांचे दोस्त संघटनेने​ एक महिन्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी निवेदन देऊन आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर भाजप सरकार निश्चित गडगडेल, असा टोला लगावत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांचे दोस्त संघटनेच्या 'ईव्हीएम हटाव, भाजप भगाव' या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.                    

आज ता. 28 ला सकाळी मुंबईतील कृष्णकुंज या निवास स्थानी लोकांच्या दोस्तांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकांचे दोस्त संघटनेने एक महिन्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी निवेदन देऊन आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज ठाकरे यांना त्या निवेदनाच्या प्रतिही देण्यात आल्या. 
                                           
दोस्तांच्या शिष्टमंडळाशी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, 27 ऑगस्ट ला दिल्लीत जे विविध पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटले, त्या सर्व पक्षप्रमुखांना मी माझ्या पक्षाच्या वतीने, ईव्हीएम नको म्हणून निवेदन दिले आहे. ईव्हीएम विरोधी मोहिमेत आम्ही लोकांच्या दोस्त सोबत आहोत.                
या शिष्टमंडळात रवि भिलाणे यांच्या सोबत समीर अंतुले, प्रशांत राणे, ममता सुरेंद्र अडागळे, मंगेश साळवी, क्रेग रोझारीओ, प्रमोद कचरू जाधव, सतशील मेश्राम, सुनंदा नेवसे आणि संतोष गवळी यांचा समावेश होता.

Web Title: BJP will fall if EVM is removed says Raj Thackeray