भाजपचा प्लॅन तयार; गणेश नाईकांना ठाणे, तर संजीव अन् संदीप नाईकांना..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

गणेश नाईक यांना ठाणे विधानसभा, संदीप नाईक पुन्हा ऐरोली आणि संजीव नाईक यांना ओवळा-माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ बहाल करून या माध्यमातून नाईकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकीकडे ठाणे जिल्ह्यावर पक्षाची पकड मजबूत करून दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना शह देण्याची रणनीती भाजपमध्ये सुरू झाली आहे. 

नवी मुंबई : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे आता नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक हे तब्बल 50 हून अधिक नगरसेवकांसोबत भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नाईक कुटुंब हे भाजपमध्ये गेले, तर जिल्ह्याच्या सत्तेची समीकरणेच संपूर्ण बदलण्याची शक्यता आहे. 

गणेश नाईक यांना ठाणे विधानसभा, संदीप नाईक पुन्हा ऐरोली आणि संजीव नाईक यांना ओवळा-माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ बहाल करून या माध्यमातून नाईकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकीकडे ठाणे जिल्ह्यावर पक्षाची पकड मजबूत करून दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना शह देण्याची रणनीती भाजपमध्ये सुरू झाली आहे. 

नाईक फॅमिली ही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत दिमतीला 50 हून अधिक नगरसेवकांची फळी असून येत्या काही दिवसांत ते भाजपमध्ये डेरेदाखल होतील, असेही जवळजवळ निश्चित झाले आहे. नाईक फॅमिली भाजपमध्ये आल्यास नवी मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ फुलणार आहे. दुसरीकडे आधीच मीरा-भार्इंदर महापालिकासुद्धा भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. आता हळूहळू कल्याण-डोंबिवली महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. नाईक यांना मानणारा या दोन्ही शहरांत मोठा वर्ग आहे. शिवाय, उल्हासनगरमधील कलानी कुटुंबाशी त्यांची जवळीक आहे.

जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर या ग्रामीण पट्ट्यांतही नाईक यांची पकड आहे. जिल्ह्यातील शिवसेनेतही त्यांचे अनेक समर्थक आहेत. यामुळे त्यांच्या येण्यामुळे भाजप एक तीर में अनेक निशाणे साधणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री आमचाच, असा वाद सुरू झाला आहे. इतर अनेक मुद्द्यांवरूनही या दोघांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे युती तुटली तर त्याचा फायदा घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs Master Plan is Ready for Naik Family