मिशेलमुळे राफेल घोटाळा विसरतील असे समजू नये: शिवसेना

Shivsena
Shivsena

मुंबई : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

ख्रिस्तियन मिशेल याला ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात अटक करून भारतात आणण्यात आले आहे. ईडीने नुकतेच मिशेलने चौकशीदरम्यान मिसेस गांधी असे नाव घेतल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपने गांधी घराण्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, काँग्रेसकडून सतत राफेल घोटाळ्याची चर्चा करण्यात येत आहे. आता शिवसेनेने भाजपला राफेल घोटाळ्यावरून 'सामना' या मुखपत्रातून लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसते. या ‘बा–चा–बा–ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल? सोनिया गांधी किंवा त्यांच्या काँग्रेसविषयी आम्हाला कणभरही ममत्व नाही, असण्याचे कारण नाही, पण राजकीय षड्यंत्रासाठी सरकारी यंत्रणांचा बेबंद वापर करू नये हे आमचे मत ठाम आहे. तीन हजार सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारातील ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ‘ईडी’ने दिल्लीच्या कोर्टात दिली व त्यावरून काँग्रेस आणि भाजपात बाचाबाची सुरू झाली आहे. मिशेल यास हिंदुस्थानात आणूनही पाच राज्यांत मोदीप्रणीत भाजपचा पराभव व्हायचा तो झालाच. पण मिशन मिशेलचे लक्ष्य 2019 आहे व तसे स्पष्टपणे दिसत आहे. 

मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची दलाली वाटली. राफेल प्रकरणात विमानांच्या किमती वाढवून घेतल्या व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com