बीकेसी चुनाभट्टी कनेक्‍टर वाहतूकीसाठी खुला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्र्यांच्या ट्‌विटनंतर एमएमआरडीएने वाहतूक सुरू कऱण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी कनेक्‍टर हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतूकीसाठी संध्याकाळपासून खुला करण्यात आला. लोकहितार्थ हा निर्णय घेतल्या संबधीचे ट्‌विट काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ट्‌विटरद्वारे केले होते. त्यानंतर रविवारी (ता. 10) संध्याकाळपासून या मार्गावरून रहदारीला परवानगी दिल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

यामुळे धारावी आणि शीव जंक्‍शनदरम्यानची वाहतूक कोंडी फुटणार आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवासाचा कालावधी 30 मिनीटांनी कमी होणार आहे. 1.6 किमी लांबीच्या आणि 17 मीटर रुंदी आणि चौपदरी अशा बीकेसी -चुनाभट्टी या कॉरीडोअरमुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे.

याशिवाय पूर्व दृतगती महामार्गाहून जाणाऱ्या वाहनेही गतीमान जातील. हा उन्नत मार्ग बीकेसी, बाबूभाई कंपाऊंड, मध्य रेल्वेमार्गावरील शीव रेल्वे स्थानक, डंकन कॉलनी, हार्बरमार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानक ते सोमय्या मैदान असा असून, मुंबईकरांचे जीवनमान सुकर करण्यासाठी हे आणखी एक पाऊल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्‌वीटमध्ये म्हटले आहे.  

web title : BKC chunabhatti connector open for transportation

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BKC chunabhatti connector open for transportation