औषधांचा काळाबाजार :  विक्रेत्या कंपन्यांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) "मेडलाईफ' या ऑनलाईन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषधविक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवड्यापूर्वी "एफडीए'च्या मुख्य कार्यालयाला भेट देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. "एफडीए'कडून मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

संरक्षण विभागाला पुरवली जाणारी सीटाग्लिप्टीन फॉस्फेट आणि विल्डाग्लिप्टीन या गोळ्या त्या विभागाच्या शिक्‍क्‍यासह बाजारात बेकायदा उपलब्ध झाली होती. या औषधांच्या पाकिटांवर "ही औषधे संरक्षण विभाग व नौदलासाठी असून विक्रीसाठी नाहीत', असे लिहिले होते; मात्र हा शिक्का व्हाईटनरद्वारे खोडून ही औषधे विकली जात होती. जानेवारी अखेरपासून मुंबईसह नवी मुंबई आणि भिवंडीतील विविध ठिकाणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले होते. 

तीन आठवड्यांच्या चौकशीनंतर तळोजा पोलिस ठाण्यात मेडलाईफ या ऑनलाईन औषध विक्रेता कंपनीवर गुन्हा दाखल केला. ही औषध विक्रेता कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी मानली जाते. तसेच, स्वामी समर्थ या दुकानासह मुलुंडमधील सेफलाईफ आणि भायखळ्यातील निवान फार्मास्युटिकल्स या कंपन्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. 

संरक्षण विभागातील काही अधिकारी या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी साध्या वेशात मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे कुणालाही याची कुणकुण लागली नाही. "एफीडीए'च्या अधिकाऱ्यांनीही याबाबत दुजोरा दिला नाही. संरक्षण, नौदलाच्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने दिले होते. 

आणखी काही जणांवर लवकरच गुन्हे 
संरक्षण, नौदलाच्या औषधांची खुलेआम बेकायदा विक्री करणाऱ्या एकूण 13 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी काही संशयितांवर लवकरच गुन्हे दाखल होतील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. 

Web Title: Black market of drugs crime against vendor companies