Special Report: राज्यात ऑक्सिजनचा काळाबाजार; पुरेसा साठा तरी मोजावे लागते तिपटीने पैसे

Special Report: राज्यात ऑक्सिजनचा काळाबाजार; पुरेसा साठा तरी मोजावे लागते तिपटीने पैसे


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा काळाबाजार सुरू झाला आहे. विक्रेत्यांनी ऑक्सिजनच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ केल्याने रुग्णालयांना त्याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात असे चित्र नसून ऑक्सिजन वाहतूकदर आणि विक्रीदरात मोठी वाढ झाल्याने अडचणी कायम आहे. 

द्रवरूप ऑक्सिजन म्हणजेच कच्चा मालाअभावी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. वितरकांना 10 रुपयांच्या ऑक्सिजनसाठी 35 रुपये मोजावे लागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने कंपन्यांकडून काळाबाजार सुरू करण्यात आला आहे. कंपन्यांकडे कच्चा माल असूनही नसल्याचे सांगितले जाते आणि जास्त दराने  द्रवरूप ऑक्सिजन विकत घ्यावे लागत आहे. कंपन्याकडून पुरवठाही सुरळीत होत नाही. त्यामुळे, रुग्णालयांना ऑक्सिजनचे वितरण वेळेवर होत नसल्याचे वितरक सांगतात. परिणामी, उपलब्ध ऑक्सिजनसाठी तिपटीने पैसे मोजावे लागत आहेत. ऑक्सिजन कंपन्या, पुरवठा करणाऱ्याकडून काळाबाजार होत असल्याचा आरोप वितरकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) ऑक्सिजनचे दर प्रति घनमीटर किंवा 1000 लिटरमागे 17.49 रुपये निश्चित केले आहेत. त्यामुळे, रुग्णाला किंवा रुग्णालयांना ते याच दरात मिळणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विक्रीवर कोणाचेच निर्बंध नाहीत. त्यामुळे काळाबाजार सुरू झाला आहे.

ऑक्सिजनचा साठा पुरेसा; मात्र वितरणात अडचणी
मर्यादित वाहतूक व्यवस्थेमुळे ऑक्सिजनच्या वितरणात अडचणी येत असून विलंब होत आहे. मर्यादित वेळेतच रिफिलिंग केले जाते. टँकर्सचा तुटवडा, लिक्विड ऑक्सिजनचा साठा तत्काळ डाऊनलोड होईल अशी व्यवस्था नाही. त्यामुळे, राज्यात ऑक्सिजनचा साठा जरी पुरेसा असला, तरी त्याचा पुरवठा आणि वितरण योग्यप्रमाणे होणे गरजेचे आहे. 

मागणी वाढताच होतो काळाबाजार
कोरोनामुळे मास्कपासून सॅनिटायझर या साहित्यांना अचानक खूप मागणी वाढली होती. या दरम्यान पुरवठा कमी असल्यामुळे साहित्य महाग झाले होते; मात्र कालांतराने पुरवठा स्थिर झाला, तेव्हा किमती आटोक्यात आल्या. त्या वेळी मास्क, सॅनिटायझर, कोरोनावर उपचारांसाठी आलेले रेमडेसेवीर, हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या सर्व गोष्टींचा काळाबाजार केला गेला होता. आता राज्यात अचानक ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, त्यामुळे त्याचाही काळाबाजार सुरू केला आहे. राज्यात काही शहरात ऑक्सिजनचा काळाबाजार होत असल्याची कबुली खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

प्रसंगी तक्रार करा
लोकांना 19 रुपयांपेक्षा जास्त दरात कोणी ऑक्सिजनची विक्री करत असेल, तर औषध प्रशासन विभागाला तक्रार करावी. काळाबाजार करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. पुढील काळात ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी नवीन केंद्र सुरू करणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

ऑक्सिजन उत्पादकांनी सूचनांचे पालन करा
ऑक्सिजन उत्पादकांनी ऑक्सिजनचे वितरण 80 टक्के मेडिकल करण्यासाठी आणि 20 टक्के इंडस्ट्रियल करण्यासाठी करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सक्त ताकीद अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उत्पादकांना दिली. 

सद्यस्थितीत 443.65 मेट्रिक टन साठा
राज्यात दररोज जवळपास 1000 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. त्या तुलनेत सध्याची ऑक्सिजनची गरज 500 मेट्रिक टन असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात जिल्हास्तरीय 1039 रुग्णालये कोव्हिडसाठी कार्यरत असून, या रुग्णालयांना दररोज 835.76 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागते. तर, 804.210 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत 443.65 ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.

ऑक्सिजनची सद्यस्थिती

जिल्हा रुग्णालये ऑक्सिजनचा साठा
(एमटी)
अमरावती 22 5.57
औरंगाबाद 95 42.76
नागपूर 66 87
पुणे 408 123.51
नाशिक 273 15.6
मुंबई 59 93.588
ठाणे 116 75.62

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com