मोहसीनच्या हत्येप्रकरणी दोष धर्माचा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

हिंदू राष्ट्रसेनेच्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई - पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेखच्या हत्येप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. विजय गंभीरे, गणेश ऊर्फ रणजित यादव आणि अजय लालगे अशी जामीन मंजूर झालेल्या तिघांची नावे आहेत.

हिंदू राष्ट्रसेनेच्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई - पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेखच्या हत्येप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. विजय गंभीरे, गणेश ऊर्फ रणजित यादव आणि अजय लालगे अशी जामीन मंजूर झालेल्या तिघांची नावे आहेत.

"आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही. मात्र, मृत मोहसीन शेखचा धर्म वेगळा होता. धर्माच्या नावाखाली ही घटना घडलेली आहे. आरोपींना भडकविण्यात आले, त्यामुळेच त्यांनी मोहसीनची हत्या केली,'' असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. मृदूला भटकर यांनी जामीन मंजूर करताना सांगितले. घटनेच्या दिवशी हे तिघे सभेत गेले होते. तिथे चिथावणीखोर भाषण झाले होते, याकडेही उच्च न्यायालयाने लक्ष वेधले. आरोपींचा मोहसीनशी कोणताही संबंध नव्हता. हिंदू राष्ट्रसेनेचा प्रमुख धनंजय देसाईने हत्येच्या काही वेळेपूर्वी झालेल्या सभेत भाषण केले होते. यात त्याने उपस्थितांना भडकावण्याचे काम केले. धनंजय देसाईचे भाषण बघून त्याने धार्मिक तेढ निर्माण केली होती हे स्पष्ट होते, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

मोहसीन आणि रियाझ हे दोघे 2 जून 2014 च्या रात्री नमाज पठण करून परतत असताना हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रियाझ स्वतःचा जीव वाचवून पळण्यात यशस्वी ठरला. मात्र, मोहसीनचा मृत्यू झाला होता. मोहसीनच्या हत्येप्रकरणी हडपसर पोलिस स्थानकात 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये धनंजय देसाईचाही समावेश होता. या प्रकरणातील तीन आरोपींनी जामीन मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयात जाणार
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोहसीनच्या कुटुंबाने या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 21 पैकी 14 आरोपींना जामीन मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारनेही जामीन देण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सरकारी वकील यासंदर्भात आपले मतही राज्य सरकारकडे पाठवण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Blame religion Mohsin's murder