स्फोटाच्या उंबरठ्यावर सीबीडी वसाहत

स्फोटाच्या उंबरठ्यावर सीबीडी वसाहत

बेलापूर - सीबीडी-बेलापूरमध्ये पार्किंगसाठी जागा आरक्षित नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. सीबीडी वसाहतीत ज्वलनशील पदार्थांचे आणि घातक रसायनांचे टॅंकर बिनधास्त उभे केले जात असल्याने स्फोटाचा धोका निर्माण झाला आहे.

कार्यालयांचे माहेरघर म्हणून सीबीडी बेलापूरची ओळख आहे. इथे अनेक सरकारी कार्यालये, महापालिका मुख्यालय, सिडको मुख्यालय, कोकण भवन, आरबीआय, रायगड भवन, इतर बॅंकांची मुख्यालये, आयटी कंपन्या, अनेक कंपन्यांच्या शोरूम आणि हॉटेल आहेत. अनेक कार्यालयांच्या आवारात वाहनांसाठी कमी जागा असल्याने कर्मचारी व कामानिमित्त येणारे नागरिक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नेहमीच कोंडी होते. 

सीबीडी सेक्‍टर ३, ४, ५ आणि ६ मध्ये राहत असलेल्यांपैकी साधारण ७५० कुटुंबीयांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून अनेक जण वाहनचालक म्हणून काम करतात. त्यांच्या वाहनांसाठी ट्रक टर्मिनल नाही. परिणामी, नाइलाजास्तव नागरी वसाहतीमधील रस्त्यांच्या कडेला ट्रक आणि टॅंकर उभे असतात. त्यात ज्वलनशील पदार्थांच्या आणि घातक रसायनांच्या टॅंकरचा समावेश असल्याने स्थानिक नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. क्‍लीनर ट्रक किंवा टॅंकर उभ्या केलेल्या ठिकाणीच स्टोव्हवर स्वयंपाक करतात. त्यामुळे आग किंवा स्फोटासारख्या गंभीर अपघाताचा धोका वसाहतीला निर्माण झाला आहे.

बेकायदा पार्किंग आणि कोंडीची ठिकाणे
सीबीडी सेक्‍टर १५ मध्ये अनेक शोरूम आणि हॉटेल आहेत. तेथे येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याने वाहतुकीत अडथळे येतात. पेट्रोल पंपापासून क्रोमा शोरूमपर्यंत मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग केले जाते.

सीबीडी सेक्‍टर ११ मधील विजय सेल्सपासून सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कार्यालये, आयटी कंपन्या, हॉटेल आणि बारच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंग.

सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकासमोरील सेक्‍टर ११ मधील अंतर्गत रस्त्यावरही बेकायदा पार्किंग. 

सीबीडीत भारती विद्यापीठापासून गुरुद्वार रोड, नागेश्‍वर मंदिर गल्ली, लायन्स पार्क, सेक्‍टर ४ आणि ५ मधील गल्लीतील रस्त्यांच्या कडेला ट्रक-टॅंकरचे पार्किंग.

सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी उड्डाणपुलाखाली असलेल्या चौथऱ्यामुळे चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते.

सीबीडी सेक्‍टर १५ मध्ये दोन मोठे भूखंड पार्किंगसाठी आरक्षित आहेत. भूखंडाचे कामही झाले आहे. निविदा प्रक्रियेचे काम सुरू असून काही दिवसांत तिथे पार्किंग सुरू होईल. सेक्‍टर ११ मध्ये पार्किंगसाठी भूखंड देण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथे पार्किंगची सुविधा आहे. तेथील रस्त्यांवर जेथे ‘नो पार्किंग’चे फलक आहेत तेथील वाहनांवर पोलिस कारवाई करत आहेत. 
- अंकुश चव्हाण  (अतिरिक्त आयुक्त, पालिका)

सीबीडीत ट्रक टर्मिनल व्हावे यासाठी अनेकदा सिडकोला निवेदने दिली. मंत्रालय, पालकमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला. सिडको याबाबत नेहमीच आश्‍वासन देते. रायगड भवनसमोरील होल्डिंग पॉण्डजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनल सुरू करण्याचे सुचवले आहे. तिथे ट्रक टर्मिनल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नागरिकांना न्याय मिळेल आणि वाहतूक कोंडीसारख्या अनेक समस्या सुटतील.
- डॉ. जयाजी नाथ (नगरसेवक)

नो पार्किंगच्या ठिकाणी कारवाई केली जाते. सीबीडीत अंतर्गत रस्त्यावर २० वर्षांपासून ट्रक आणि टॅंकर उभे केले जात आहेत. या वाहनांमध्ये जेवण बनवण्यास बंदी आहे. यापुढे याबाबत तपासणी करण्यात येईल. 
- बाबासाहेब तुपे  (पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, बेलापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com