जवानांच्या मनगटावर अंध बहिणींचे रक्षाबंधन!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

आवड आणि रोजगारही...
‘नॅब’मधील मुली आणि महिला विक्रीसाठी राख्या तयार करतात. त्यामध्ये फॅन्सी आणि कार्टूनच्या विविध राख्यांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या सुमारे ८० हजार राख्या बनवण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट कंपन्या, ट्रायडंट हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेलसारख्या ठिकाणी राखीचे प्रदर्शन भरवण्यात येते. दहिसर विद्यामंदिरात राखीची विक्री केली जाते. त्यांची किंमत १० ते ३० रुपयांपर्यंत आहे. राखी मेकिंग व डिझाईननुसार अंध मुली-महिलांना रोजगार दिला जातो.

मुंबई - देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडच्या (नॅब) अंध मुलींनी एक लाख तिरंगी राख्या तयार केल्या आहेत. २ ऑगस्ट रोजी त्या भारतीय सैन्य दलाच्या दिल्लीतील मुख्यालयात पाठवण्यात येणार आहेत.

रे रोडमध्ये नॅबची अंध मुली व महिलांची कार्यशाळा आहे. दरवर्षी तिथे काम करत असलेल्या महिला सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी एक प्रेमाचा ऋणानुबंध म्हणून राखी बनवत असल्याची माहिती कार्यशाळेच्या प्रशिक्षिका नम्रता शिंदे यांनी दिली. राख्या ‘नॅब’ने स्वखर्चातून एचडीएफसी आणि पिडिलाईट यांच्या सहकार्याने बनवल्या आहेत. यंदा प्रथमच भारतीय नौदलासाठी पाच हजार राख्या बनवण्यात आल्या आहेत. त्या नौदलापर्यंत पोहोचवण्यात आल्या. नौदलाकडून आभाराचे आणि उपक्रमाच्या कौतुकाचे पत्रही ‘नॅब’ला मिळाले आहे असे शिंदे यांनी सांगितले.

भारतीय सैन्य दलाच्या दिल्लीच्या मुख्यालयातून राख्या जम्मू-काश्‍मीर, जयपूर आदी अन्य सीमेवरील सैनिकांना रवाना होतील. ‘राखी मिळाली... खूप आनंद झाला’ असे पत्र सीमेवरून सैनिक जेव्हा पाठवतात, तेव्हा आम्हाला खूप समाधान मिळते, अशा भावना अंध भगिनी व्यक्त करतात. अंध बहिणींसाठी जवान भेटवस्तू नंतर पाठवतात. आमचा आणि जवानांचा वर्षानुवर्षे ऋणानुबंध अधिकच दृढ होत असल्याचा आनंद आहे असे शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blind Girl Jawan Rakhi