दृष्टिहीन बहिणींची सैनिकांना माया

उत्कर्षा पाटील 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - भारतीय जवानांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड इंडिया (नॅब) संस्थेतील दृष्टिहीन मुलींनी तयार केलेल्या खास तिरंगी राख्या कुलाब्यातील सैन्यदलाच्या मुख्यालयात रवाना झाल्या आहेत. एक लाख राख्या लवकरच विविध सीमांवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचून बहिणीच्या हळुवार प्रेमाचा संदेश देणार आहेत.

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती असलेल्या सैनिकाला आपली एक राखी त्याच्या रोजच्या कामातून एक सुखाचा क्षण देईल, अशी बहिणींची भावना आहे. अनेक वर्षांपासून नॅब असा उपक्रम राबवत आहे. त्यासाठी १८ ते ५० वयोगटातील मुली व महिलांना खास प्रशिक्षण दिले जाते. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी नॅबचे रे रोडमध्ये वर्कशॉप सेंटर आहे. तिथे तीन वर्षे मोफत प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती नॅबच्या या प्रकल्पाच्या प्रमुख नम्रता शिंदे यांनी दिली. या महिला फॅन्सी राख्याही तयार करतात. यासाठी लागणारे साहित्य नॅबतर्फे दिले जाते. एअर इंडिया, एक्‍स्चेंजर, ट्रॅव्हल्स एक्‍स अशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये या राख्यांची विक्री होते. सेंटरमधील प्रत्येक मुलीला कमीत पाच ते सहा हजार तर जास्तीत जास्त १६ ते १७ हजार रुपये नफा मिळतो.

आर्थिक मोबदल्यापेक्षाही आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिक बांधवांपर्यंत आपली राखी जाते, याचे मुलींना खूप समाधान मिळते. जवानांची आभाराची पत्रे तसेच फोन येतात. राख्या मिळाल्याचा आनंद त्यातून व्यक्त होतो.
- नम्रता शिंदे, प्रमुख, प्रशिक्षक, नॅब वर्कशॉप सेंटर

Web Title: blind Sister make rakhi for solider