सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे संसार उघड्यावर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या दोघांचे पुनर्वसन तर दूरच उपचारांवर झालेला खर्चही परत देण्याचे सौजन्य रुग्णालयाने दाखवलेले नाही. 

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी संसर्ग असलेली उपकरणे वापरल्याने जानेवारीत पाच जणांचे डोळे निकामी झाले. 

पवईतील रफीक खान (वय ५८) आणि गोरेगावमधील संतोषनगर येथील गौतम गव्हाणे (वय ४६) हे त्यांपैकीच. रफीक हे एका कंपनीत वाहनचालक होते; मात्र एक डोळा निकामी झाल्याने त्यांची नोकरी सुटली.  कर्करोगामुळे मुलाचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तेव्हापासून पत्नीसह सून आणि नातवंडांची जबाबदारी माझ्यावर होती. मिळेल त्यात घर चालवत होतो; पण आता नोकरीच गेल्याने सून घरकाम करते आणि बायको रस्त्यावर कपडे विकून कुटुंबाचा गाडा हाकते. घराचे भाडे थकल्याने बेघर होण्याची वेळ आली आहे, अशी खंत रफीक यांनी व्यक्त केली.

गौतम हे रिक्षाचालक होते; त्यांचाही एक डोळा निकामी झाल्याने रिक्षा दोन महिन्यांपासून घरासमोरच उभी होती; पण हप्ते थकल्याने रिक्षा बॅंकेला परत करावी लागली. डोळ्यासह रोजीरोटीही गेली. मोठा मुलगा बारावीत वाणिज्य शाखेत शिकतो. त्याला उच्चशिक्षण घ्यायचे आहे; पण आता तो नोकरीच्या शोधात आहे. माझा डोळा गेल्याने त्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मुलगी बारावीला जाणार आहे, तिच्या शिक्षणाचा भार कसा उचलायचा हाही प्रश्‍नच आहे, अशी खंत गौतम यांनी व्यक्त केली.

ट्रॉमा केअर रुग्णालयात शस्त्रक्रियेवेळी डोळ्याला संसर्ग झाल्याने पाचही जणांना परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी उपचारासाठी गौतम आणि रफीक यांचे प्रत्येकी ३२ हजार खर्च झाले. उसनवारीत घेतलेली ही रक्कम फेडायचे संकटही या दोघांपुढे उभे आहे. 

खर्च मिळणार, पुनर्वसनाचे काय? 
केईएम रुग्णालयात मोफत उपचार होतील, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते; मात्र तरीही गौतम आणि रफीक यांनाच भुर्दंड बसला. त्यांना या खर्चाची परतफेड केली जाईल, असे पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी ‘सकाळ’ला सांगितले; मात्र डोळा गमावल्याने चार महिन्यांपासून घरी बसण्याची वेळ आलेल्या या दोघांच्या पुनर्वसनाचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

नेमके काय घडले?
ट्रॉमा केअर रुग्णालयात काही रुग्णांवर ४ जानेवारीला शस्त्रक्रिया झाली होती; मात्र शस्त्रक्रियेनंतर सात रुग्णांचा डोळा प्रचंड दुखू लागला. त्यांची तपासणी केली असता, डोळ्यात संसर्ग झाला असल्याने त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार झाल्यानंतरही रफीक खान, गौतम गव्हाणे, फातिमाबी शेख, रत्नमा सन्यासी, संगीता राजभर या पाच जणांचा एक-एक डोळा निकामी झाला. मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी वापरलेली उपकरणे संसर्ग विरहित न केल्याने हा प्रकार घडल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अरुण चौधरी यांना निलंबित करण्यात आले, तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरभजन सिंह बावा यांची पदावनती करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blindness due to faulty cataract surgery at Troma Care Hospital