रेल्वेच्या हट्टापायी डोंबिवलीची कोंडी

शर्मिला वाळुंज
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

डोंबिवलीतील कोपर रेल्वेपूल धोकादायक झाल्याने येत्या २८ ऑगस्टला तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुलावरील भार कमी करण्यासाठी रेल्वेने कल्याण-डोंबिवली पालिकेला पुलावरील पदपथ व डांबराचा थर कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच महावितरणला पुलावरील वाहिन्या हटविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या केबल रेल्वेनेच टाकून दिल्या असतानाही त्या हटविण्याचा खर्च महावितरणला करण्यास बजावले आहेत.

ठाणे : डोंबिवलीतील कोपर रेल्वेपूल धोकादायक झाल्याने येत्या २८ ऑगस्टला तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुलावरील भार कमी करण्यासाठी रेल्वेने कल्याण-डोंबिवली पालिकेला पुलावरील पदपथ व डांबराचा थर कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच महावितरणला पुलावरील वाहिन्या हटविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या केबल रेल्वेनेच टाकून दिल्या असतानाही त्या हटविण्याचा खर्च महावितरणला करण्यास बजावले आहेत.

मात्र, महावितरणकडे निधीच नसल्याने रेल्वे किंवा पालिका प्रशासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, आम्ही त्वरित वाहिन्या हटवू, अशी भूमिका महावितरणने घेतली आहे. रेल्वेच्या हट्टापायी डोंबिवलीकरांची वाहतुकीबरोबरच वीजकोंडीही होण्याची शक्‍यता आहे.

डोंबिवली पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल हा धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करावा, असा तगादा रेल्वेने पालिकेकडे लावला आहे. रविवारी या संदर्भात एक बैठक पार पडली. बैठकीत पदपथ, डांबरी थर काढण्याचे काम पालिकेला; तर पुलावरील विद्युत वाहिन्या हटवण्याबाबात महावितरणला सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु महावितरणकडे कोणत्याही कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
आम्हाला प्रथम वरिष्ठांना पत्रव्यवहार करावा लागेल. कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यापासून सर्वच बाबी आहेत. यासाठी किती महिन्यांचा कालावधी लागू शकतो याची आम्हालाच माहिती नाही, असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुळात मार्च महिन्यात या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यावेळी आम्ही रेल्वेला या वाहिन्या भूमिगत टाकण्याबाबत सांगितले होते; मात्र रेल्वेने तेव्हा आमचे न ऐकता आम्हाला पुलावरून वाहिन्या टाकण्यास सांगितल्या. आता त्यांनी टाकलेल्या वाहिन्या हटवण्याचा खर्च आम्हालाच करण्यास सांगितले आहे. त्यासाठी आमच्याकडे निधीच नसून रेल्वेने अथवा पालिकेने आम्हाला या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.     

१८० टन वजन कमी होणार
कोपर उड्डाणपुलावरील पदपथ, विद्युतवाहिन्या व पुलावरील डांबराचा थर काही प्रमाणात काढण्यात येणार आहे. एकूण १८० टन वजन कमी करण्यात येणार आहे. डांबराचा थर काढण्यासाठी व पुन्हा रस्ता सुरळीत करण्यासाठी साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अवजड वाहनांना पुलावर बंदी करण्यात आली आहे; तर दुचाकी व रिक्षांची वाहतूक सध्या पुलावरून सुरू आहे.

डोंबिवली पश्‍चिमेत वीज खंडित!
पुलावरील एका दिशेचा पदपथ हटविण्यात आला आहे; परंतु दुसऱ्या दिशेला वाहिन्या असल्याने काम करताना त्या अडथळा ठरत आहेत. पदपथ हटवताना वाहिन्यांना धक्का पोहोचून कोणतीही हानी होऊ नये यासाठी दिवसातील काही तास वीजपुरवठा खंडित करून त्या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. 

कोपर पुलावरील वाहिन्या काढण्यासंदर्भात महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु महावितरणकडे निधी उपलब्ध नाही. रेल्वेने अथवा महापालिकेने निधीची तरतूद करून दिल्यास वाहिन्या हटवल्या जातील. 
- धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, महावितरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Block In Dombiwali Due to Railway