
Mumbai Local: अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 11, 12 मार्च रोजी 'ब्लॉक'
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आज आणि उद्या (शनिवारी आणि रविवारी) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री अंधेरीतील गोखले पुलाचे गर्डर्स काढून टाकल्यामुळे नियोजित गाड्या रद्द करून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर, मुंबई महानगरपालिका रेल्वे-ओव्हर-ब्रिजच्या पुनर्बांधणीचे काम हाती सुरू होईल. यासंदर्भातील माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 9.30 ते रविवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. गोखले पुलासाठी स्टील गर्डरची उभारणी करण्यासाठी यादरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आल्या तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचे पाडकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे पाडकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आज शनिवारी, 8 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. तर बोरिवलीहून चर्चगेटसाठी स्लो लोकल रात्री 11.34 वाजता सुटणार आहे.
जाणून घ्या इतर मार्ग?
सकाळी 12:10 ते दुपारी 4:40 पर्यंतच्या ब्लॉकच्या दरम्यान, गोरेगावपर्यंत नियोजित लोकल धावतील. गोरेगाव ते चर्चगेट हार्बर मार्गावरून प्रवासी प्रवास करू शकतात. तर गोरेगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरून अतिरिक्त सेवा सुरू होतील. विरार ते चर्चगेट दरम्यानची शेवटची जलद लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल. वसई रोडवरून अंधेरीकडे जाणारी शेवटची स्लो लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल.