BLOG : दर्शनीय दुबई!

जयवंत चव्हाण 
Thursday, 23 January 2020

दुबईत सध्या 25वा शॉपिंग फेस्टिव्हल सुरू आहे. त्यानिमित्त पर्यटकांचा ओढा तिकडे वाढला आहे. त्या पर्यटकोत्सुक दुबईचे हे प्रवासचित्र... 

दुबई हा जसा रोजगाराच्या शोधात असलेल्या असंख्य भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय, तेवढाच तो पर्यटकांच्या औत्सुक्‍याचाही विषय. हल्ली उच्च मध्यमवर्गीयही खरेदीला दुबईला जातात. त्यात मराठी माणसांचेही प्रमाण मोठे. त्यामुळे दुबईला निघाल्यानंतर, तेथे काय खरेदी करणार, काय आणता येईल, अशा अनेक सूचना, सल्ले आणि आदेश मिळाले होतेच. त्यात पहिल्यांदा जाणारांना थोडा तणाव असतोच... तशात आपल्याकडचा नागरिकत्वाचा वाद, तिकडे अमेरिका-इराण यांच्यातील वाढलेला तणाव, त्याच्या दुबईत काय प्रतिक्रिया असतील, असे काही काळजीचे मुद्दे होते... पण हा सर्व तणाव दुबई विमानतळावर उतरल्यावर दूर झाला.

विमानतळावरची पर्यटकांची गर्दीच दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या उत्साहाची साक्ष देत होती. आशियायी देशांसोबतच युरोपातील पर्यटकांचा उत्साह त्यात जास्त दिसत होता. दुबईत स्थायिक भारतीयांची संख्या अधिक आहे. त्यात केरळी नागरिकांचे प्रमाण अधिक. त्याची साक्ष जागोजागी पटत होती. विमानतळावर दुबईचे चलन दिरहम घेण्यापासून खरेदीची सुरुवात झाली. पण तिथल्याच एका काऊंटरून सल्ला मिळाला, की बाहेर यापेक्षा स्वस्त मिळेल. हे आश्‍चर्यच होते आमच्यासाठी... दुबईवारी केलेल्या काहींनी सांगितले होते, की भारतापेक्षा दुबई विमानतळावर चलन स्वस्त दरात मिळेल. पण आमचा अनुभव वेगळा होता. आणखी काही काऊंटरवर माहिती घेतली, पण दर तसेच होते. शेवटी चलन बाहेर घ्यायचे असा निर्णय घेऊन बाहेर पडलो. 

Image may contain: 2 people, crowd, skyscraper, sky and outdoor

दुबई विमानतळावर आम्हाला न्यायला आलेला वाटाड्या मुळचा वसईकर होता. आमच्या गाडीचा चालकही मल्याळी होता. त्यामुळे आपण परदेशात नसून, भारतातील एखाद्या राज्यात असल्याचे वाटून गेले. त्या चालकाशी छान हिंदी-इंग्रजीत गप्पा रंगल्या. आपोआपच परिसराची माहिती लगेच सुरू झाली आणि बरोबरच आमच्या प्रश्नांची सरबत्तीही... शहरातील छान गुळगुळीत रस्ते, त्यांवरून धावणाऱ्या उंची आलिशान गाड्या आणि प्रचंड वर्दळ असूनही वेगाने सुरू असलेली ती वाहतूक... लगेच आपल्या वाहतुकीशी मनातल्या मनात चाचपडून पाहत राहिलो. दुबईतील प्रसिद्ध "बुर्ज खलिफा' ही जगातील सर्वात उंच इमारत. दुबईतील अनेक भागातून ती दिसत होती. प्रचंड मोठ्या विमानतळानंतर प्रचंड उंचीची इमारत हे आकर्षण होतेच. तेथील अनेक विविध आकाराच्या गगनचुंबी इमारतीही लक्षवेधी आहेत. सर्वात जुन्या वस्तुसंग्रहालयापासून नव्याने होऊ घातलेल्या ग्रंथालयाची अर्धवर्तुळाकार इमारत, मोठमोठे मॉल्स, रस्त्यासोबत धावणारी चालकविरहित मेट्रो सुखावून जात होती. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलनिमित्त पर्यटकांचे स्वागत करणारे अनेक फलकही दिसत होते. या इमारतीही पर्यटकांचा विचार करून बांधलेल्या असाव्यात. कारण प्रत्येक इमारत वेगळी होती. त्या प्रेक्षणीय ठरतील याची काळजी घेतलेली दिसत होती. दुबईत जवळपास 80 टक्के लोक इतर आणि 20 टक्के स्थानिक नागरिक आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बाहेरचे लोक मोठ्या संख्येने दिसतात. याची जाणीव सर्वांनाच आहे हेही जाणवते. शिवाय पर्यटकही जगभरातून येत असल्याने दुबईने या सर्व नव्या संस्कृतींना आपलेसे केले आहे. त्यामुळेच पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्वांचा उत्साह पावलोपावली दिसतो. वाळवंटातील प्रचंड उष्म्यातून दिलासा देणारे हे थंडगार दिवस असल्याने सर्वाधिक गर्दीही याच काळात दुबईत दिसते. सोबत पर्यटन विभागाने या फेस्टिव्हलच्या सवलतींचा वर्षाव केला आहेच. तो पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करतोय. 

Image may contain: 1 person, standing, crowd, night and outdoor

प्रचंड आकाराचा दुबई मॉल आणि सोबत बुर्ज खलिफा ही पर्यटकांची आकर्षणस्थळे. शिवाय खाडीच्या पाण्याचा वापर करून अनेक बाजार, रेस्तरॉं ठिकठिकाणी उभारलेले आहेत. लामेर, अल सीफ, अल खवानीज, सिटी वॉक अशी ही ठिकाणे. अमिरातीच्या संस्कृतीबरोबरच विविध आधुनिक संस्कृतीचा मिलाफ अल सीफ येथे दिसतो. त्यात जगभरातील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. तेथे फूडट्रकसोबतच बोटिंग, लहान मुलांसाठी विविध गेम्स, बर्फावरचे खेळ, पाणवठे, वैशिष्ट्यपूर्ण रोषणाई मुलांच्या आनंदात भर घालतात. अल सीफमध्ये जुनी अमिराती संस्कृती दाखवणारी घरे उभारण्यात आली आहेत. त्यातही नव्या-जुन्याचा मेळ घातला आहे. 
तेथून जवळच असणाऱ्या स्पाईस सुक (मसाला) आणि गोल्ड सुक (सुवर्ण बाजार) यांची सफर खरेदी करणारांना उत्साह देणारी ठरते. मसाला बाजारात अनेक प्रकारचे मसाले दिसतातच, शिवाय अनेक प्रकारच्या सुकवलेल्या बिया, फळे दिसतात. सुकवलेले लिंबू, भोपळ्याच्या बिया दिसल्या. फक्त केशर विकणारी काही दुकाने पाहून थक्क व्हायला होते. अनेक प्रकारचे केशर तिथे पाहायला मिळते. पण त्याची विक्री मात्र सोन्याच्या दराने होते. त्यापेक्षा सुवर्ण बाजारातच गेलेले परवडते. हा बाजार अक्षरश देदीप्यमान आहे.

Image may contain: 2 people, crowd

सोन्याचे विविध प्रकारचे ड्रेस, जगातील सर्वात मोठी हिऱ्याची अंगठीही तेथे "याचि देही याचि डोळा' पाहायला मिळाली. सुवर्णबाजारात अरबी डिझाइन्सचे प्रमाण जास्त असले, तरी भारतीयांचा कल जास्त असल्याने काही दुकानांमध्ये खास भारतीयांना आवडणाऱ्या डिझाईन्सही उपलब्ध आहेत. चाणाक्षांना ते नक्की सापडेल. पण दराचे काय... इराण युद्धामुळे सोन्याचे दर वर गेले होते. त्यात भारतापेक्षा खूप जास्त दरफरक नाही, असेही जाणवले. शिवाय तुम्हाला विमानतळावरच्या अधिकाऱ्यांची चिंता करावी लागते. नियमांची काळजी घ्यावी लागते. आणखी एक बाब म्हणजे मॉल वगळता सगळीकडे दराची घासाघीस करता येते, हा काही बाजारहाट करणारांचा सल्ला इथे कामी येते. ते कौशल्य हवेच. याचा अनुभव ग्लोबल व्हिलेजमध्येही येतो. 

Image may contain: indoor

या व्हिलेजमध्ये जगभरातील अनेक देशांची संस्कृती आणि वैशिष्ट्ये सांगणारी मोठमोठी पॅव्हेलियन आहेत. ते फिरायला किमान सहा-सात तास तरी हवेत. येमेनच्या पॅव्हेलियमनमध्ये अनेक प्रकारचे मध पाहायला मिळाले. व्हाईट मधासोबतच विविध फ्लेवरचे मध, सौदी अरेबियाचे खजूर उपलब्ध आहेत. इराणच्या बाजारात तर अनेक प्रकारचे केशर पाहायला मिळते. इजिप्त, दक्षिण आफ्रिका अशा अनेक पॅव्हेलियनमध्ये केवळ फिरणेदेखील आनंददायी ठरते. परफ्यूम तरी किती असावेत... ते पाहता आपण सुगंधाबरोबरच काय घ्यावे याने संभ्रमित होतो. कपडे, पारंपरिक वस्तू इथे खरेदी करता येऊ शकतात. भारताचेही भव्य पॅव्हेलियन येथे आहे. खाद्यसंस्कृतीसोबतच मनोरंजनामुळेही फिरण्याचा शिणवटा दूर होतो. शिवाय स्थानिक बाजारातही अनेक प्रकारची खजूर चॉकलेटस; तसेच खजुराच्या विविध जाती दिसतात. त्यात लोहयुक्त, कॅल्शियमचे प्रमाण असलेले खजूर, पिस्ता- बदाम, बेदाणे असा सुका मेवा मिळतोच; पण दरात घासाघीस करूनच घ्यावा. म्हणजे खरेदीचा भारतीय आनंद मिळतो. सर्व खरेदी झाल्यानंतर बिल घेताना पासपोर्ट नोंद करून घेतले, म्हणजे वस्तूंवरील कराचा परतावा विमानतळावर घेता येतो. विमानतळावर पासपोर्ट स्कॅन करून या नोंदी पाहून ऑनलाईन परतावा मिळतो. त्याची काळजी खरेदी करतानाच घेतलेली बरी. 

Image may contain: 1 person, night and outdoor

आनंददायी हाटा 
ओमानच्या सीमेवरील डोंगररांमध्ये हाटा वसले आहे. पूर्वी हाटा किल्ला तिथे होता. त्याचे बुरूज त्याची साक्ष देतात. आता नव्या गावांमध्ये ते लपून गेले आहेत. जमिनीवर माती ओतल्याप्रमाणे हे डोंगर आहेत; पण दगड अत्यंत कठीण आहे. दुबईमध्ये जो काही पाऊस पडतो तो हाटामध्येच. त्यामुळे खजुराखेरीज जी काही फळे किंवा भाज्या पिकवल्या जातात त्या हाटामध्येच. शारजाहचे वाळवंट पार केले की हाटाला पोचतो. तिथल्या डोंगररांगांमध्ये पर्यटकासांठी अनेक सोयी उपलब्ध आहेत. थंडगार हवेत अनेक छोट्या आधुनिक रूम्स, सोबत बार्बेक्‍यूची सोय आहे. सोबत माऊंटन हायकिंग, नेमबाजी, रिव्हर क्रॉसिंग असे साहसी खेळ येथे आहेत. तेथेही आपला एक ठाणेकर तरुण भेटला. विशेष प्रकल्प म्हणून तो तिथे आला आहे. शिवाय हाटा धरणाजवळ कायाकिंग, पेडल बोटिंगचा आनंद घेता येतो.

Image may contain: mountain, sky, outdoor, nature and water

या भागात अत्याधुनिक सुविधा असलेले कॅरावान आहेत. यालाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, असे येथील केरळी गाईडने सांगितले. सोबत हाटा व्हिलेज, मार्केटची सफर करता येते. हाटा व्हिलेजमध्ये जुन्या अरबी घरांची उभारणी केली आहे. तत्कालीन राहणीमानाचा परिचय यातून होतो. पण तिथल्या अनेक वस्तूही ओळखीच्याच दिसल्या. आपल्या अनेक वस्तुसंग्रहालयामध्येही याच वस्तू दिसतात. त्यामुळे संस्कृतीमधील साम्य दिसून आले.

( VIDEO : दुबई मॉल परिसरातील कारंज्यांचा खेळ, पाहण्यासाठी क्लिक करा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blog by jayvant chavhan on dubai shoping festival