'ब्लू व्हेल' पडला साडेतीन लाखांना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - उरणच्या केगाव समुद्र किनारी मृतावस्थेत आढळलेला ब्लू व्हेल मासा कांदळवन वन विभागाला साडेतीन लाखांना पडला आहे. त्याची विल्हेवाट लावण्याच्या चार दिवसांच्या मोहिमेसाठी वन विभागाने सर्व साहित्य, मजूर, इतर साधनसामग्री आदींवर इतका खर्च केला आहे. पहिल्यांदाच कांदळवन वन विभागाला मृत सागरी जीवासाठी इतका प्रचंड खर्च करावा लागला.

20 टन वजनाचा हा नर ब्लू व्हेल मासा गुरुवारी सकाळी मृतावस्थेत आढळल्यानंतर स्थानिकांनी वन विभागाला कळविले. खडकाळ भागांत अडकलेल्या या मृतदेहाची विल्हेवाट लावायला कांदळवन वन विभागाला तब्बल चार दिवस लागले. कुजलेला मृतदेह साफ करण्यासाठी अलिबागहून आणलेले मजूर, चाकू, सांगाडा धुतल्यानंतर साफ करण्यासाठीचे साहित्य, मजुरांचे जेवण, पगार आदींसाठी चार दिवसांचा खर्च अंदाजे साडेतीन लाखांवर गेला आहे.

कांदळवन वन विभागाने या व्हेलचा सांगाडा सोमवारी सायंकाळी उशिरा ऐरोलीतील फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यात आणला. दोन वर्षांत तेथे सागरी जीवांच्या सांगाड्याचे संग्रहालय उभारले जाणार आहे. ब्लू व्हेलचे दर्शन शंभर वर्षांतून एकदा होते. महाराष्ट्र किनारपट्टीवर ब्लू व्हेल खूपच दुर्मीळ आहे, अशी माहिती कांदळवन वन विभागाचे उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांनी दिली.

महाराष्ट्रातील दर्शन
- 2015 मध्ये सिंधुदुर्ग भागात ब्लू व्हेल खोल समुद्रात आढळून आला. त्याचे छायाचित्रणही बरेच गाजले.
- 2016 मध्ये रत्नागिरी किनाऱ्यावर ब्लू व्हेल आढळून आला. प्राणिमित्रांनी त्याला पुन्हा समुद्रात ढकलले.
- 2015 मध्ये रेवदंडा येथे 42 फुटांचा ब्लू व्हेल किनारपट्टीवर आला होता. त्याला वाचवण्यात अपयश आले.
- गेल्या शुक्रवारी ब्लू व्हेलचा मृतदेह उरण येथील केगाव येथे आढळून आला. त्याच्या सांगाड्याचे जतन केले जाणार आहे.

Web Title: blue vail fish expenditure