पालिकेचा बिमस्ट्रोवॅड प्रकल्प माहूल खाडीवर, उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधणार

समीर सुर्वे
Monday, 21 December 2020

महानगर पालिकेनं बिमस्ट्रोवॅड प्रकल्प अंतर्गत माहूल खाडीवर उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: कांजूरमार्ग येथील मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या भुखंडावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे मिठागार आयुक्तालय माहुल येथील पंपिंग स्टेशनसाठीही जागा हस्तांतरीत करत नसल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी नागरिकांशी संवाद साधताना ही माहिती जाहीर केली आहे. महानगर पालिकेनं बिमस्ट्रोवॅड प्रकल्प अंतर्गत माहूल खाडीवर उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा भूखंड मिठागार आयुक्तालयाचा असल्याने तो ताब्यात मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पालिका प्रयत्न करत आहे. मात्र मिठागार आयुक्तांकडून दाद मिळत नाही. अखेरीस पालिकेने जुलै महिन्यात हा भूखंड आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही प्रतिसाद मिळाला नाही. ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही हा मुद्दा मांडला होता. मात्र,अद्याप हा भूखंड पालिकेला मिळालेला नाही.

महानगर पालिकेने आतापर्यंत हाजीअली, वरळी येथे क्‍लिव्हलॅन्ड लव्हग्रो, रे रोड,खार येथील गझदरबंद, जुहू येथील ईर्ला येथे सहा पंपिंग स्टेशन उभारले आहेत. आता ओशीवरा येथील मोगारनाला आणि माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारायचे आहेत. मोगारा नाला येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी लवकरच निविदा मागवल्या जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जागेचा वाद नक्की काय

महानगर पालिका ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रयत्न 2007 पासून करत आहे. मात्र, हा परिसर दलदल आणि खारफुटीचा असल्याने जागा निश्‍चित होत नव्हती. काही वर्षांपूर्वी पालिकेने जागा निश्‍चित केली. पण, ही जागा मिठागर आयुक्तांच्या मालकीची आहे. त्यांनी जागा हस्तांतरीत करण्यासाठी महानगर पालिका गेल्या काही वर्षांपासून सतत पत्रव्यवहार करत आहे. मात्र मिठागर आयुक्तांकडून प्रतिसाद मिळत नाही.
 
पंपिंग स्टेशनचे महत्वाचे काय

महानगर पालिका या ठिकाणी 286 कोटी रुपये खर्च करुन उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारणार आहे. त्यातून सेकंदला 150 घनमीटर पाण्याचा निचरा करता येईल. समुद्राला भरती असतानाही शहरातील पावसाळी पाण्याचा निचारा करता येणार आहे. त्यामुळे चेंबूर, वडाळासह किंग्जसर्कल गांधी मार्केट या परिसरातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होणार आहे.

हेही वाचा- मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेवर ठाम

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC Bimstrowad project build high capacity pumping station Mahul Bay


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Bimstrowad project build high capacity pumping station Mahul Bay