मुंबईच्या नगरसेवकांना हवा स्वत:साठी राज्यभरात टोलमुक्त प्रवास!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

अनेक नगरसेवकांना विविध उपक्रमांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांची पाहणी करण्यासाठी अनेकवेळा शहराबाहेर जावे लागते. अशावेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागतो. खासदार आणि आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी

मुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी आता टोल माफीची मागणी केली आहे. मानधनात पाचपट वाढ करावी, अशी सातत्याने मागणी करणाऱ्या 227 नगरसेवकांना आता राज्यातील सर्व टोल नाक्‍यांवर विनामूल्य प्रवास हवा आहे.

खासदार- आमदार यांच्या प्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी करणारा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे.

वरळी सी-लिंकवर टोलमाफी दिल्यानंतर आता राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवर
विनामूल्य प्रवास देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. अनेक नगरसेवकांना विविध उपक्रमांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांची पाहणी करण्यासाठी अनेकवेळा शहराबाहेर जावे लागते. अशावेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागतो. खासदार आणि आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्‍यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना मंजूर करून महापालिका सभागृहात ठराव करण्यात आला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे अभिप्रायसाठी पाठवण्यात आला आहे.

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. तिचा अर्थसंकल्प हा देशातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा मोठा आहे. मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जात असून शहरातील सुमारे सव्वाकोटी जनतेला अत्यावश्‍यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. यासाठी नगरसेवकांना मुंबईबाहेर विविध राजकीय व सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहावे लागते. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्येही राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांनाही भेटी देण्यास जावे लागते. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्‍यांवर नगरसेवकांना टोलमाफी मुंबईच्या नगरसेवकांना दिली जावी, अशी ठरावाची सूचना नगरसेवक तुकाराम पाटील यांची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC corporators demand concession in Toll across Maharashtra