पक्षांना करावी लागणार बंडखोरांची मनधरणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाने सर्व प्रभागांसाठी, मनसेने 203, भाजपने 192, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 180 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. मंगळवार (ता. 7) हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांना आपल्या अधिकृत उमेदवारांसाठी बंडखोरांना खाली बसण्यासाठी मनधरणी करावी लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी पंचरंगी लढत होणार आहे. शिवसेना, कॉंग्रेस, भाजप या पक्षांत अटीतटीचा सामना रंगणार असला तरी, सर्वच पक्षांत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेने बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर केली नाही. उमेदवारांना दूरध्वनी करून एबी फॉर्म दिले होते. त्यानंतर आज अखेरच्या दिवशी सर्व प्रभागांतील उमेदवारांनी अर्ज भरले.

कॉंग्रेस पक्षानेही मुंबईत 227 प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. कॉंग्रेस पक्षातही मोठी बंडखोरी झाली आहे. भाजपने 192 जागांवर उमेदवार उभे केले असून, उर्वरित जागा घटक पक्षांना सोडल्या आहेत. यात केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंला 25, रासपला 5, शिवसंग्रामला 4 अशा जागा सोडल्या आहेत. भाजपमधून बंडखोरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

मनसेने 203 प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. मनसेतून बाहेर पडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या पक्षाला फारसा बंडखोरीचा फटका बसलेला नाही. मनसे खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने 180 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर समाजवादी पक्ष, एमआयएम आदींनीही उमेदवार उभे केले आहेत.

या सर्व बंडोबांना थंड करण्यासाठी अधिकृत उमेदवार आणि त्या त्या पक्षांचे नेते पुढील चार दिवस प्रयत्न करणार आहेत.

Web Title: bmc election