परवानगी मिळाली, 27 छोट्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणं होणार शक्य

भाग्यश्री भुवड
Wednesday, 16 September 2020

टास्क फोर्सने परवानगी दिलेल्या आणि ज्या खासगी रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बर्यापैकी सुविधा असतील अशाच रुग्णालयांना कोविडचे रुग्ण दाखल करुन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने 73 पैकी 27 खासगी आणि छोट्या रुग्णालयांना पुन्हा कोरोनाचे उपचार करण्याची परवानगी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात पालिकेने 73 नर्सिंग होम्समध्ये कोविड 19 च्या रुग्णांना दाखल करुन उपचार करण्यास बंदी घातली कारण, त्यांच्या ऑडिटमध्ये खासगी सुविधांमध्ये 41 टक्के मृत्यू ऑगस्ट महिन्याच्या मध्य काळात नोंदवले गेले.

टास्क फोर्सने परवानगी दिलेल्या आणि ज्या खासगी रुग्णालयात कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बर्यापैकी सुविधा असतील अशाच रुग्णालयांना कोविडचे रुग्ण दाखल करुन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, 2000 अतिरिक्त बेड्स आणि 300 ICU बेड्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे. 

महत्त्वाची बातमी छम छम बारबाला झाल्यात बिझनेस वूमन, 'अशी' शक्कल लढवून भरतायत पोटाची खळगी

टास्क फोर्सने गेल्या आठवड्यात छोट्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करुन उपचार करायचे झाल्यास काही बाबींची पूर्तता करावी लागेल असे सांगितले होते. त्यानुसार, छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये किमान 60 बेड्स, 5 आयसीयू बेड्स, 2 व्हेंटिलेटर आणि 2 एम डी डाॅक्टर्स अशी व्यवस्था असली पाहिजे. त्यानंतरच या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करुन घेतले जाऊ शकेल.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर सरकारी आणि पालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण आला होता. त्यामुळे, छोटी खासगी रुग्णालये, खासगी दवाखाने सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक खासगी दवाखाने सुरू करण्यात आले. मात्र, काही छोट्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांकडून दुप्पट पैसे आणि मृत्यू दर जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अखेर काही छोट्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आता ही रुग्णालये पुन्हा कोविड रुग्णां वर उपचार करतील आणि पालिका रुग्णालयांचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल.

( संपादन - सुमित बागुल )

BMC gave permission to 27 small hospitals in mumbai to treat covid 19 patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC gave permission to 27 small hospitals in mumbai to treat covid 19 patients