कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी पालिकेची प्रमुख रुग्णालये सज्ज

कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी पालिकेची प्रमुख रुग्णालये सज्ज

मुंबई: दिल्लीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिका प्रशासनासह पालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून मुंबईकरांची साथ हवी तशा प्रमाणात मिळत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही रुग्णसंख्या वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमीच असल्याचा पालिकेकडून करण्यात आला आहे. तरी ही आरोग्य विभाग सज्ज असून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड्स, औषधे, ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. 

नायर रुग्णालयात फक्त 20 टक्के भरलेले बेड्स

पालिकेच्या नायर रुग्णालयाला समर्पित कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, आता तिथले ही विभाग हळूहळू पूर्ववत करण्यात आले आहे. त्यावेळेस एकूण 1100 बेड्स फक्त कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी देण्यात आले होते. पण यातील फक्त 100 ते 150 बेड्स सध्या भरलेले आहेत. बाकी इतर बेड्सवर नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शिवाय, नायर रुग्णालयाचे अनेक डॉक्टर्स इतर कोविड सेंटरमध्ये कामाला आहेत. त्यांना ही पुन्हा बोलावले जाईल. दुसऱ्या लाटेसाठी पालिका रुग्णालये सज्ज आहेत, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.

केईएम रुग्णालयातही 495 बेडस कोविड रुग्णांसाठी होते. त्यापैकी फक्त 54 बेड्स भरलेले असून बाकी इतर बेड्स नॉन कोविड रुग्णांसाठी वापरले जात आहेत. आधी ही संख्या 450 ते 500 च्या दरम्यान होती. मात्र आता ही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दुसरी लाट आली तरी आपण पूर्ण तयारीत आहोत असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. 

सायन रुग्णालयात ही कोरोना रुग्णांची संख्येत ही कमतरता आली असून आता फक्त 80 ते 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 277 बेडस कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी देण्यात आले होते. मात्र आता त्यांची संख्या गरजेनुसार कमी करण्यात आली आहे. जर गरज वाटलीच तर नॉन कोविड रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले जाईल. शिवाय, ज्या शस्त्रक्रिया थांबवता येतील अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया लांबवल्या जातील. आधी सर्व बेड्स भरलेले असायचे आता ती संख्या कमी झाली आहे असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. 


पुढील तीन महिन्यांसाठी औषधांचा मुबलक साठा

पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात 1500 बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. यातील 250 आयसीयू बेड्स आणि 1250 आयसोलेशन बेड्स आहेत. त्यापैकी 595 बेड्स भरलेले आहेत. 250 आयसीयू ही भरलेले आहेत. त्यात अजून 50 बेड्सची भर घालून त्यांची संख्या वाढवू शकतो. पुढील तीन महिन्यांसाठी औषधांचा साठा ही पुरेसा आहे. शिवाय, डॉक्टर्स, नर्सेस ही उपलब्ध आहेत. 300 पेक्षा जास्त डॉक्टर्स, 650 नर्सेस, 470 रुग्ण सांभाळणारे कर्मचारी, 180 सफाई कामगार अशी संपूर्ण टिम सज्ज आहे. बऱ्यापैकी स्टाफ हा जूनपासून काम करत असल्याने त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. रुग्णालयात बरे होण्याचा दर हा 90 टक्के असून 4 टक्के लोकांना आयसीयूची गरज भासत आहे. दरम्यान, पूर्ण स्टाफ हा संभाव्य कोविड 19 दुसऱ्या लाटेसाठी तयार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसुळ यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गरज पडल्यास 427 कोविड सेंटर केवळ आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटर मध्ये 70 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होऊ शकतात, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे आणि गणेशोत्सव आणि दिवाळीत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गर्दीमुळे आता रुग्णवाढ दिसणार असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र ही रुग्णवाढ गणेशोत्सवानंतर झालेल्या वाढीप्रमाणे नसेल तर सरासरी एक हजारांपर्यंतच असेल आणि लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वासही आरोग्य विभागाने व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, पालिकेने आरोग्य यंत्रणा तैनात ठेवताना दोन दिवसांत सुरू करता येतील अशी 36 कोविड केअर सेंटर तर आठ दिवसांत सुरू करता येतील अशा रिझर्व्ह प्रकारात 427 कोविड केअर सेंटर तैनात ठेवली असल्याची माहिती दिली. ही सर्व सेंटर्स सुरू झाल्यास तब्बल 70 हजार 518 बेड उपलब्ध होऊ शकतात.

शेकडो आयसीयू, व्हेंटिलेटर बेड रिक्त

कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे कोविड केअर सेंटरमधील 21 हजार 697 बेड रिक्त आहेत. याशिवाय 1978 पैकी 830 आयसीयू, 8423 पैकी 5866 ऑक्सिजन बेड, 1184 पैकी 393 व्हेंटिलेटर बेड सद्यस्थितीत पालिकेकडे रिक्त आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC major hospitals ready forpossible second wave corona 36 covid centers reserved

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com