शिवसेनेचे नगरसेवक अज्ञातवासात जाणार? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापौर निवडणुकीत आपले नगरसेवक गैरहजर राहू नयेत, यासाठी शिवसेना 84 नगरसेवकांसह पाचही अपक्षांना अज्ञातवासात ठेवण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - महापौर निवडणुकीत आपले नगरसेवक गैरहजर राहू नयेत, यासाठी शिवसेना 84 नगरसेवकांसह पाचही अपक्षांना अज्ञातवासात ठेवण्याची शक्‍यता आहे. 
मुंबईच्या महापौरपदासाठी 9 मार्चला महासभा होणार आहे. आवाजी पद्धतीने हात उंचावून ही निवड होते. त्यामुळे शिवसेनेचे आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक भाजपच्या उमेदवाराला थेट पाठिंबा देण्याची शक्‍यता नाही. त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊन, त्या प्रभागात फेरनिवडणूक होऊ शकते; परंतु ते गैरहजर राहिल्यास मतदानाच्या वेळी त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे शिवसेना महापौरनिवडीच्या दोन ते तीन दिवसआधी सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवण्याची शक्‍यता आहे. 

सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवले नाही तरी, शिवसेनेच्या 12 विभागप्रमुखांवर या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी ठेवण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. एका वेळी 89 नगरसेवकांना एकत्र ठेवणे शक्‍य नसल्याने प्रत्येक विभागातील नगरसेवकांना एका ठिकाणी ठेवण्यात येईल. त्यांना 9 मार्च रोजी थेट महापालिका मुख्यालयात आणण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

भावी महापौरावर भार? 
सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवण्यासाठी होणारा खर्च महापौरपदाच्या उमेदवाराला करावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने खर्चिक होण्याची शक्‍यता आहे. 

नगरसेवकफुटीचा पूर्वेतिहास 
नगरसेवकफुटीचा इतिहास महापालिकेत नवीन नाही. यापूर्वी 1996-97 मध्ये शिवसेनेने कॉंग्रेसचे 12 नगरसेवक फोडून आपला महापौर निवडून आणला होता. त्या वेळी महापौरनिवडीसाठी गुप्त मतदान पद्धत होती. या फाटाफुटीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गुप्त मतदान पद्धत बदलून आवाजी पद्धतीने महापौरनिवडीची प्रक्रिया सुरू केली. 

Web Title: Bmc mayor election politics