बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

समीर सुर्वे | Tuesday, 8 September 2020

अभिनेत्री कंगना राणौतच्या पाली हिल येथील बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेने आज कंगनाला नोटीस बजावली आहे. ति

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या पाली हिल येथील बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेने आज कंगनाला नोटीस बजावली आहे. तिच्या कर्मचाऱ्यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पालिकेच्या पथकाने नोटीस भिंतीवर चिकटवली. 24 तासात बंगल्यामध्ये सुरु असलेल्या कामाच्या परवानगीचे कागदपत्र सादर करण्याचे नोटीसीत सांगण्यात आले आहे. 24 तासांत पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदेशीर ठरवून तोडण्याची शक्यता आहे. 

रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची वारेमाप लूट; दरेकर यांचा सरकारवर हल्ला

महापालिकेच्या एच पश्चिम प्रभागाच्या इमारत कारखाने विभागाच्या पथकाने सोमवारी या बंगल्याची पाहणी केली होती. त्यात काही अतिरिक्त बांधकाम असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. त्यानूसार, पालिकेने नोटीस बजावली असून 24 तासांत कागदपत्र सादर न झाल्यास नियमानूसार कारवाई करण्यात येईल, असे एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांनी सांगितले. कंगनाने कागदपत्र सादर केल्यानंतरही त्यात काही उणिवा असल्यासही पुढील कारवाई करता येऊ शकते, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. हा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरु करण्यासाठी रितसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम 354(अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असे या नोटीसमध्ये नमुद आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी तिघांना अटक; 11 सप्टेंबरपर्यंत एनआयए कोठडी

बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही ठिकाणी वाढीव बांधकामही झाले आहे. तर, पुर्वीची दोन बांधकाम यात जोडण्यात आली आहेत. तसेच, अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्याजागी कार्यालय बांधण्यात आले आहे. तसेच ,परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आले आल्याचे नोटीसीत म्हटले आहे. 

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर; आयुक्तांना दिले निवेदन

एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित
कंगनाचे खार येथेही घर असून त्यातही बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने 2018 मध्ये नोटीस पाठवली होती. या नोटीसला कंगणाने दिंडोशी न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतर आता कार्यालयातही बेकायदा बांधकाम झाल्याचा मुद्दा पुढे आले आहे.

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )