महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिका सज्ज 

bmc
bmc

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान "राजगृह' आणि अन्य ठिकाणी आवश्‍यक नागरी सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

मुंबई महापालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क, दादर रेल्वेस्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे नियंत्रण कक्ष, आरोग्य सेवा, तात्पुरता निवारा, प्रसाधनगृह आदी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था म्हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या सात शाळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये आवश्‍यक नागरी सोई-सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुमारे 10 हजार अनुयायांची व्यवस्था होऊ शकेल, अशी माहिती परिमंडळ- 2 चे सह आयुक्‍त नरेंद्र बरडे यांनी दिली. 

चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना, व्हीआयपी कक्ष व नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तब्बल एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपातही तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदान व परिसरात 180 शौचकूप असलेली 18 फिरती शौचालये, रांगेतील नागरिकांसाठी 40 शौचकूप असलेली चार फिरती शौचालये व 380 पिण्याच्या पाण्याचे नळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे 16 टॅंकर उपलब्ध करण्यात आले आहेत. 

शिवाजी पार्क परिसरात 469 स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने चैत्यभूमीलगतच्या चौपाटीवर जीवरक्षकांसह बोटीची व्यवस्था केली आहे. चैत्यभूमी येथील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण केले जाईल. भ्रमणध्वनी चार्जिंगसाठी शिवाजी पार्क मैदानावरील मंडपात 300 पॉइंटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. या माहिती पुस्तिकेच्या एक लाख प्रतींचे मोफत वाटप चैत्यभूमी येथे करण्यात येणार आहे. माहिती पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवारी (ता. 5) मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे होईल. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी महापालिका सज्ज आहे. अनुयायांनी या सोई-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले आहे. महापालिकेचे सुमारे 250 अधिकारी व 6000 कर्मचारी 4 ते 7 डिसेंबर या काळात चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात 24 तासांसाठी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील. 

विविध सोई-सुविधा 

- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष. 
- स्काऊट-गाईड हॉल येथे भिक्‍खू निवास. 
- शवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादन. 
- चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात अनुयायांना मार्गदर्शनासाठी 100 फूट उंचीचे निदर्शक फुगे. 
- फायबरची 200 तात्पुरती स्नानगृहे व 60 तात्पुरती शौचालये. 
- इंदू मिलमागे फायबरची तात्पुरती 60 शौचालये व 60 स्नानगृहे. 
- रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेले 150 बाक. 
- शिवाजी पार्कव्यतिरिक्‍त वडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालये. 
- दादर (पश्‍चिम) रेल्वेस्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष/ माहिती कक्ष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com